कलम ३७० भारताचा अंतर्गत विषय, राजकारणात हस्तक्षेप करण्याचा हेतू नाही – युरोपियन खासदार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/kashmir-union.jpg)
काश्मीर खोऱ्यात आम्ही सत्य शोधण्यासाठी आलो आहोत. भारताच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करण्याचा आमचा हेतू नाही असे काश्मीर दौऱ्यावर असलेल्या युरोपियन युनियनच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने म्हटले आहे. मंगळवारी काश्मीरच्या कुलगाममध्ये पाच बिगर काश्मिरी मजुरांची दहशतवाद्यांनी हत्या केली. या कृत्याचाही युरोपियन खासदारांनी निषेध केला आहे.
कालच २३ खासदारांचे शिष्टमंडळ श्रीनगरमध्ये दाखल झाले. त्याच दिवशी दहशत निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांनी बिगर काश्मिरी मजुरांची हत्या केली. आम्ही तुमचे मित्र आहोत. आम्ही इथे सत्य शोधण्यासाठी आलो आहोत असे शिष्टमंडळातील एका सदस्याने माध्यमांशी बोलताना सांगितले. समाजाच्या विविध गटांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. भ्रष्टाचारापासून शाळांसंदर्भातील विविध मुद्यांवर चर्चा झाली.
भारताच्या अंतर्गत राजकारणात आम्हाला रस नाही. आम्हाला सर्वसामान्य लोकांना भेटायचे होते. काश्मीरला भेट देणे हा सुखद अनुभव होता. योग्य दिशेने प्रगती सुरु आहे. काश्मीरमधल्या लोकांना शांती आणि विकास हवा आहे. त्यांना शाळा, कॉलेजेस हवी आहेत असे माध्यमांशी संवाद साधताना शिष्टमंडळाने सांगितले. काश्मीर दुसरा अफगाणिस्तान बनावे अशी आमची इच्छा नाही. काश्मीरमधला दहशतवाद फक्त भारतासाठी नाही तर आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेचा विषय आहे असे एका खासदाराने सांगितले.