…मग पाकिस्तानात गुंतवणूक करा : ब्रिटिश गुंतवणूकदाराला राकेश झुनझुनवालांचा सल्ला
महाईन्यूज | प्रतीनिधी
गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि दलाल स्ट्रीटचे ‘वॉरेन बफेट’ म्हटले जाणारे शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या मते, ‘भारताच्या आर्थिक विकासाबाबत चिंता करण्याचं काहीही कारण नाही’. इतकंच नाही तर, ‘ज्या गुंतवणूकदारांना भारताच्या आर्थिक विकासाबाबत शंका वाटते त्यांनी भारतात गुंतवणूक करुच नये, उलट पाकिस्तानात जाऊन गुंतवणूक करावी’ असा सल्लाही झुनझुनवाला यांनी दिला आहे.
27 सप्टेंबर रोजी ‘वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम 2019’ मध्ये बोलताना झुनझुनवाला यांनी, भांडवली बाजारातील गुंतवणूक, मालमत्ता वाटप आणि भारताच्या आर्थिक वृद्धीबाबत चर्चा केली. ही चर्चा सुरू असताना एका ब्रिटिश गुंतवणूकदाराच्या प्रश्नांनी झुनझुनवाला चांगलेच त्रस्त झाले. लंडनमधील गुंतवणूकदार सुभाष ठकरार हे या फोरममध्ये उपस्थित होते. झुनझुनवाला बोलत असताना ठकरार हे त्यांना वारंवार भारतातील वाढत्या बेरोजगारीबाबत प्रश्न विचारत होते. ठकरार हे ‘लंडन चेम्बर ऑफ कॉमर्स’चे माजी चेअरमन देखील आहेत. ठकरार यांच्या पहिल्या प्रश्नावर झुनझुनवाला यांनी, ‘चांगला विकास दर हाच बेरोजगारीच्या समस्येवरील उपाय आहे’, असं उत्तर दिलं. त्यावर ठकरार यांनी, ‘गेल्या दशकभरात विकास दरामध्ये इतकी वाढ झाली, पण तरीही बेरोजगारी काही कमी झालेली नाही’ असा प्रश्न विचारला. दोघांमध्ये यावरुन वादविवाद सुरू झाला. त्यानंतर एक वेळ अशी आली की, झुनझुनवाला चांगलेच वैतागले व त्यांनी गुंतवणूकदाराला गप्प बसण्यास सांगितलं.