TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळेच शहरात पाणी साचतेय

पुणे : सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या साथीने केलेले सिमेंट काँक्रिटचे रस्ते पाणी साचण्याच्या प्रकाराला जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांनी संगनमताने केलेली नालेसफाई आणि पावसाळापूर्व कामे, जागोजागी केलेली रस्ते खोदाई आणि सिमेंट काँक्रिटचे रस्ते या प्रकारामुळेच जोरदार पावसात शहर पावसात जात आहे.

शहर आणि उपनगराला रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले. शहरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने मध्यवर्ती भागासह उपनगरात महापालिकेच्या कामाची पोलखोल केली. दीड ते दोन तास झालेल्या पावसाने शहराच्या सर्वच भागात पाणी साचले. पंचवीसहून अधिक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटनांबरोबरच झाडपडी आणि भिंत पडण्याच्या काही घटना झाल्या. या सर्व प्रकाराला महापालिकेचा बेजबाबदार कारभारच कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी सायंकाळी पाच ते रात्री आठ या कालावधीत ६२.४६ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात झाली. या भागात ८५.०९ मिमी पाऊस नोंदविला गेला. तर सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात २२.६१ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. जोरदार पावसाने संपूर्ण शहर पाण्यात गेले. मात्र या परिस्थितीला महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार असल्याचे पुढे आले आहे.

सर्वपक्षीय नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षांत शेकडो किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे केले. सुस्थितीतील रस्ते खोदून त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. सिमेंट रस्त्यांमुळे पाण्याचा निचराच होऊ शकला नाही. पावसाळी वाहिन्या आणि पावसाळी गटारे ही अनेक रस्त्यांवर नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्याची यंत्रणा ज्या रस्त्यांवर आहे त्याची नियमित साफसफाई होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. नाल्यांना आलेला पूर, रस्त्यांना आलेले नदीचे स्वरूप, चौकांचे झालेले तळे, त्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणेकरांचे अतोनात हाल झाले. नालेसफाई, पावसाळी गटारांची सफाईसाठी अवघ्या तीन महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च केला. पण हा सगळा खर्च पाण्यातच गेल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या सर्व प्रकारावर महापालिका प्रशासनाने दरवेळेस प्रमाणे ‘कमी कालावधीत जास्त पाऊस झाला म्हणून ही स्थिती ओढावली’ असा खुलासा करत घडलेल्या प्रकाराकडे डोळेझाक केली आहे.

मदतीसाठी संपर्क क्रमांक

हवामान खात्याने पुढील दोन दिवस शहरात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे घर, इमारती, सोसायटींमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. ०२०-२५५०६८००/१/२/३/४ या चोवीस तास कार्यरत कक्षाशी संपर्क साधावा तसेच ०२०-२६४५१७०७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. अशा घटना घडू नयेत, यासाठी दीर्घकालीन कायमस्वरुपी उपाय केले जातील.

– डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button