हिंदू मटण दुकानांसाठी ‘मल्हार सर्टिफिकेशन’; मंत्री नितेश राणेंची घोषणा

Nitesh Rane | भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केलेली एक घोषणा चर्चेत आली आहे. नितेश राणे यांनी झटका मटण दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम लाँच केले आहे. त्यामुळं झटका मटण विक्री करणाऱ्या दुकानदारांना हे प्रमाणपत्र मिळणार आहे.
नितेश राणे म्हणाले, की आम्ही मटणाच्या दुकानांना मल्हार झटका प्रमाणपत्र देणार आहोत. येथे केवळ झटका मांसाची विक्री होईल. त्यासाठी आम्ही मल्हार सर्टिफिकेशन नावाची व्यवस्था तयार केली आहे. या मल्हार सर्टिफिकेशनच्या संकेतस्थळावर दुकानांची नोंदणी करता येईल. याद्वारे हिंदूंसाठी हिंदूंची मटणाची दुकानं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या दुकानांमध्ये १०० टक्के हिंदूंचं प्राबल्य दिसेल. मांस विक्री करणारी व्यक्ती हिंदू असेल.
हेही वाचा : ‘कसब्यातील एका भूखंडावरून धंगेकर शिंदे गटास प्यारे झाले’; संजय राऊतांचा दावा
नितेश राणे यांच्या घोषणेनंतर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एआयएमआयएमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले, मला नितेश राणे यांना विचारायचं आहे की तुम्हाला मटण, कबाब, बिर्याणी हे सगळं खायचं आहे. मग तरी देखील मटणाच्या या भानगडीत कशाला पडताय? कशाला मटणाच्या मागे लागलेले आहात? आम्हाला मटण खाऊ द्या आणि तुम्ही देखील खा. तुम्हाला काही प्रमाणपत्र द्यायचंच असेल तर द्या.