Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘येत्या ऑलिम्पिक मोहिमेसाठी आतापासूनच महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाची ‘स्ट्रॅटेजिक ब्लूप्रिंट’ तयार’;  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

नागपूर :  महाराष्ट्र आज देशातील ‘स्पोर्ट्स पॉवरहाऊस’ म्हणून ओळखले जात आहे. खेलो इंडिया युथ गेम्स, नॅशनल गेम्स आणि नॅशनल स्कूल गेम्स या तिन्ही प्रमुख स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील विविध संघांनी आपले जेतेपद कायम ठेवत अव्वल स्थानाकडे वाटचाल केली आहे. जागतिक पातळीवर महाराष्ट्रानी आपला अपूर्व ठसा क्रीडा क्षेत्रातही उमटवावा यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. येत्या ऑलिम्पिक मोहिमेसाठी आतापासूनच महाराष्ट्राने ‘स्ट्रॅटेजिक ब्लूप्रिंट’ तयार केली असून शहरांसमवेत ग्रामीण भागात राष्ट्रीय स्तराचे खेळाडू घडावेत यासाठी तालुका स्तरावर ५ कोटी, जिल्हा स्तरावर २५ कोटी आणि विभागीय स्तरावर ५० कोटी रुपयांचे क्रीडा संकुल शासन साकारत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

कोराडी येथील सेवानंद विद्यालय मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, गृहराज्यमंत्री पंकज भोयर, आमदार आशीष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी खासदार सुबोध मोहिते, नागपूर जिल्हा ग्रामीण कबड्डी असोशिएशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे, क्रीडा उपसंचालक पल्लवी धात्रक व मान्यवर उपस्थित होते.

खेळाडूंना सक्षम व्यासपीठ आणि आर्थिक पाठबळ उपलब्ध व्हावे, त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सुविधा मिळाव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपण राज्यातील खेळाडूंना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहोत. विदर्भातील ग्रामीण खेळाडूंना चांगल्‍या दर्जाचे क्रीडा शिक्षण मिळावे, अद्ययावत सुविधा मिळाव्यात यासाठी मानकापूर येथे ७४६ कोटी रुपये निधीतून महाराष्ट्र शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘नागपूर स्पोर्ट्स हब’ साकारत आहे. नागपूर मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी एक चांगले वातावरण तयार झाले असून संकेत बावनकुळे यांनी राज्यपातळीवरच्या कबड्डी स्पर्धांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी आयोजकांबद्दल समाधान व्यक्त केले.

स्व. अजित दादांनी कबड्डी या खेळाला मिळवून दिलेली प्रतिष्ठा आणि त्यांनी निर्माण केलेला उज्वल वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. खेळाडूंना केवळ मैदानावरील सुविधाच नाही, तर मैदानाबाहेरील सुरक्षितता देणेही आमचं कर्तव्य आहे. म्हणूनच गुणवंत खेळाडूंना १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत २५ वाढीव गुणचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये खेळाडूना आरक्षण ठेवले आहे. त्यांचा डेटा सेव्ह करण्यासाठी आपण ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. त्यांना थेट आर्थिक लाभ आणि विमा संरक्षण देणारी प्रणाली शासन राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; शनिवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार

या स्पर्धा कोराडी येथे होण्याबाबत स्व. अजीत दादां यांच्या समवेत झालेल्या संवादाच्या हळव्या आठवणींचा उल्लेख राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांनी आपल्या भाषणात केला. राज्यातील मैदानी खेळांच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव त्यांनी केला. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ही ग्रामीण भागातील खेळाडूंच्या प्रतिभेला व्यासपीठ देणारी एक मोठी उपलब्धी आहे. तब्बल १९ वर्षांनंतर या प्रतिष्ठित राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन नागपूर जिल्ह्यात होत आहे याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेत राज्यभरातील ३२ संघांचा सहभाग असून येथील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कबड्डी स्पर्धा कोराडीच्या क्रीडा परंपरेला नवे बळ देणारी ठरेल असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

कबड्डी खेळाची ओळख आता ऑलिम्पिकपर्यंत पोहचली आहे. कबड्डी हा फक्त खेळ नाही, तर आपल्या मातीतला संस्कार आहे. हा खेळ आपल्याला धैर्य, चपळता, एकाग्रता, संयम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघभावना शिकवतो. हा खेळ ऊर्जा आणि रोमांच यांनी भरलेला आहे. ग्रामीण भागातून घडलेले असंख्य कबड्डीपटू आज राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव उज्ज्वल करत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे असे पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले.

नागपूर जिल्हा ग्रामीण कबड्डी असोशिएशन व विविध संघटनांनी ही स्पर्धा कोराडी येथे आयोजित करुन नवतरुणांना  योग्य दिशा देण्याचे अतिशय मोलाचे कार्य केले आहे. आपण सर्वांनी नागपूर ग्रामीणमध्ये क्रीडा चळवळ अधिक बळकट करण्याचा संकल्प करू. “खेळाडू घडला तर देश घडतो” हा विचार आपण प्रत्येक गावात पोहोचवू या, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमाच्या या स्पर्धा आयोजना मागची भूमिका आपल्या प्रास्ताविकात सांगितली. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसेच गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनीही आपल्या मनोगतात सहभागी कबड्डी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. याच बरोबर कोराडी सारख्या ठिकाणी कबड्डी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संकेत बावनकुळे व आयोजक टिम मधील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

दिनांक 4 मे पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू राहणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button