मनसेच्या ‘दीपोत्सव’ कार्यक्रमावरून भाजपा नेत्याचा राज ठाकरेंना खोचक टोला; म्हणाले..
![Ashish Shelar said that someone used to ask the question of Marathi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Raj-Thackeray-780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि सलीम खान यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. ते भाजपातर्फे आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमात बोलत होते.
आशिष शेलार म्हणाले, दीपोत्सवाचे आयोजन कुठल्याही पक्षाने करावे. ते स्वागतार्ह आहे. कलाकाराला जात, धर्म, भाषा नसते. पण, गुरूवारी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत एक उद्घाटन झालं. आम्ही गायक उत्तरा केळकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करतोय. आता मराठीचा प्रश्न कुणी कुणाला विचारायचा?
हेही वाचा – ICCने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला दिला मोठा धक्का! क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व निलंबित
दीपोत्सव करणाऱ्यांनी सलीम खान आणि जावेद अख्तर यांना घेऊन टिमकी वाजवून घेतली. पण, आमचे मराठी कलाकार छोटे नाहीत. मराठी कलाकारांच्या उपस्थितीत दीपोत्सव झाला पाहिजे, ही भाजपाची संकल्पना आहे. आम्हीही एखाद्या कार्यक्रमाला सलीम खान आणि जावेद अख्तर यांना बोलवू. पण, तो कार्यक्रम दीपावलीचा नसेल, असंही आशिष शेलार म्हणाले.
यासह आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. तिसरे अजून घराबाहेर पडले नाहीत. हिंदुत्वाचे पूरस्कर्ते म्हणून आयुष्य़भर राजकारण करणाऱ्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी काँग्रेसचा हात पकडला, असं आशिष शेलार म्हणाले.