ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लेखनासाठी समृद्ध वाचन आवश्यक – विनिता ऐनापुरे

पिंपरी चिंचवड |  “साहित्यिकांनी लेखनासाठी आधी समृद्ध वाचन करणे आवश्यक आहे. कवयित्री शांताबाई शेळके यांचे वाचन खूप अफाट असल्याने त्यांनी विपुल अन् बहुआयामी लेखन केले!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक विनिता ऐनापुरे यांनी जिजाऊ पर्यटन केंद्र, चिंचवडगाव येथे बुधवार, दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी मांडले. सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीवर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि शब्दधन काव्यमंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्यपुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून विनिता ऐनापुरे बोलत होत्या.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री छाया कांकरिया होत्या; तर महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, उद्योजक अभय पोकर्णा, ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे, कैलास भैरट, अशोक गोरे, प्रकाशिका नीता हिरवे, मीना पोकर्णा, रामचंद्र प्रधान यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शोभा जोशी, वर्षा बालगोपाल, सविता इंगळे, माधुरी विधाटे आणि प्रकाश परदेशी यांना मान्यवरांच्या हस्ते शांता शेळके काव्यपुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह, शाल, ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते. त्यानंतर ‘शब्दांच्या पलीकडले’ या सत्रांतर्गत तानाजी एकोंडे, राजेंद्र वाघ, फुलवती जगताप, श्यामला पंडित, संगीता सलवाजी, सुप्रिया लिमये आणि हेमंत जोशी यांनी शांता शेळके यांच्या मुक्तच्छंद, अष्टाक्षरी, गीत, लावणी अशा विविध प्रकारच्या कवितांचे अभिवाचन करून रसिकांना शांताबाईंच्या अष्टपैलू काव्यप्रतिभेचा प्रत्यय दिला.

छाया कांकरिया यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “शांताबाईंच्या प्रतिमेतून ‘प्रेमस्वरूप आई’चा भास होतो!” अशी उत्कट भावना व्यक्त केली. जिजाऊ पर्यटन केंद्रातील झाडांना शेणखत घालून अभिनव पद्धतीने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कंक यांनी प्रास्ताविक केले. सुहास घुमरे, नितीन हिरवे, अरुण कांबळे, नीलेश शेंबेकर, श्यामला पानसे, जयश्री श्रीखंडे, हेमांगी जाधव यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप गांधलीकर यांनी केले. सुभाष चव्हाण यांनी आभार मानले. संकष्टी चतुर्थी आणि चिंचवडगावातील मोरया गोसावी उत्सवाचे औचित्य साधून गणपतीच्या सामुदायिक आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button