breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

चिंता वाढवणारी बातमी! देशात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित महाराष्ट्रात; पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण

मुंबई |

करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूने सोमवारी देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत शिरकाव केला आहे. मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असून, राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या दहावर पोहोचली आहे. तर देशपातळीवर ही संख्या २३ वर पोहचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशामधील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे.

  • मुंबईत सापडले दोन रुग्ण…

दक्षिण आफ्रिकेतून २५ नोव्हेंबरला मुंबईत आलेल्या ३७ वर्षीय प्रवाशाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रवासी करोनाबाधित असल्याचे २९ नोव्हेंबरला आढळले होते. त्यामुळे त्याचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले होते. त्यात त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णाच्या सहवासातील व्यक्तींचा शोध घेतला असता त्याच्याबरोबर राहिलेल्या ३६ वर्षीय मैत्रिणीलाही करोनाची लागण झाल्याचे ३० नोव्हेंबरला आढळले होते. ही महिला २५ नोव्हेंबरला अमेरिकेतून मुंबईत आली होती. तिलाही ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे जनुकीय कर्मनिर्धारणादरम्यान स्पष्ट झाले.

  • संपर्कात आलेल्या ३२० जणांचा शोध…

या दोघांनाही कोणतीही लक्षणे नसून, त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांनीही फायझर लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या होत्या. या दोघांच्या सहवासातील पाच अतिजोखमीच्या आणि ३१५ कमी जोखमीच्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे.

  • पहिला रुग्ण डोंबिवलीत नंतर पिंपरीमध्ये…

शनिवारी डोंबिवलीत राज्यातील पहिला ओमायक्रॉन रुग्ण आढळला होता. त्यापाठोपाठ पिंपरीतील सहा आणि पुण्यातील एकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळले होते. आता आणखी दोन रुग्णांची भर पडल्याने राज्यातील रुग्णसंख्या १० झाली आहे.

  • कोणत्या राज्यात किती रुग्ण?

महाराष्ट्राखालोखाल राजस्थानमध्ये नऊ, कर्नाटकमध्ये दोन तर गुजरातमध्ये ओमायक्रॉनबाधित एक रुग्ण आढळून आलाय. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्येही ५ डिसेंबर रोजी एक ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आलाय.

  • ११ प्रवाशांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी

दक्षिण आफ्रिकेसह अतिजोखमीच्या देशांतून राज्यात आलेले ११ प्रवासी करोनाबाधित असल्याचे आढळले आहे. त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

  • आठवड्याभरातील परदेशी प्रवाशांची संख्या…

१ डिसेंबरपासून आफ्रिकेसह अतिजोखमीच्या देशांतून राज्यात सहा हजार २६३ प्रवासी आले असून, या सर्वांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली. अन्य देशांमधून २८ हजार ४३७ प्रवासी आले असून, त्यातील ६३५ जणांच्या ‘आरटीपीसीआर’ चाचण्या करण्यात आल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button