breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिंताजनक! डेंग्यूने राज्यात २२ जणांचा मृत्यू

मुंबई |

करोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी राज्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाने डोके वर काढले आहे. डेंग्यूमुळे आत्तापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर डेंग्यूचे सर्वाधिक १० मृत्यू नागपूरमध्ये झाले असून त्यानंतर चंद्रपूर, वर्धा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात पावसाचे प्रमाण कमी होताच ऑगस्टपासून डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढला. गेल्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव तुलनेने कमी दिसत होता. परंतु या वर्षी करोनाची दुसरी लाट ओसरत असलेल्या काळात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रसार पुन्हा वाढल्याचे आढळते.

ऑगस्टपर्यत डेंग्यूचे सुमारे तीन हजार रुग्ण आढळले होते आणि ११ जणांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबरमध्ये मात्र डेंग्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला असून ३४०१ रुग्ण नव्याने आढळले आहेत. ऑक्टोबरमध्ये तुलनेने रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अजूनही आजाराचा प्रादुर्भाव फारसा कमी झालेला नाही. ऑक्टोबरच्या २० दिवसांमध्ये डेंग्यूचे १२५१ रुग्ण नव्याने आढळले आहेत.

२० ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार, राज्यात डेंग्यूचे ९ हजार ५४१ रुग्ण आढळले असून २०१९च्या तुलनेत चौपट वाढ झाली आहे. २०१८ साली डेंग्यूची साथ आली होती, तेव्हा वर्षभरात ११ हजार ३८ रुग्ण आढळले होते. तसेच २०१९ आणि २०२०च्या तुलनेत मृत्यूही वाढले असून आत्तापर्यंत डेंग्यूमुळे २२ जण दगावले आहेत. सर्वाधिक मृत्यू विदर्भात झाले असून नागपूर ग्रामीण आणि महानगरपालिकेमध्ये प्रत्येकी पाच, चंद्रपूरमध्ये चार आणि वर्ध्यात तीन जण डेंग्यूमुळे दगावले. यासह कोल्हापूरमध्ये तीन आणि ठाणे, भंडारा, नगर येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

  • चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ

डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रसार एकाच जातीच्या डासांपासून होत असल्यामुळे डेंग्यूचा प्रसार वाढला की चिकुनगुनियाचा प्रसारही वाढतो. गेल्या वर्षी चिकुनगुनियाचे ७८२ रुग्ण आढळले होते. डेंग्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या वर्षी चिकुनगुनियांच्या रुग्णांची संख्याही दुपटीहून अधिक वाढून १९४७ पर्यंत गेली आहे. २०१८ला डेंग्यूची साथ आली त्या वेळी वाढलेल्या चिकुनगुनियाच्या रुग्णांच्या तुलनेत या वर्षी ऑक्टोबरमध्येच रुग्णांची संख्या जवळपास ९००ने वाढली.

सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या कमी झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत सध्या जालना आणि गोंदिया भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे. सप्टेंबरमध्ये चिकुनगुनियाचे ४७८ रुग्ण आढळले होते, ऑक्टोबरमध्ये १६८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तुलनेने प्रादुर्भाव कमी झाला आहे, असे राज्य कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र जगताप यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button