Views:
13
नवी मुंबई | मुंबईच्या दक्षिण बाजूला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेअंर्तगत जलद गतीने वाहतुकीला जोडणाऱ्या बेलापूर ते पेंदार या पहिल्या मेट्रो मार्गातील खारघर ते पेंदार या पहिल्या टप्प्यातील वाहतुकीला लवकरच सुरुवात होत असताना सिडकोने इतर तीन मार्गाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून या कामांना यंदा सुरुवात होण्याची शक्यता आहे.नवी
सिडकोच्या संचालक मंडळाने या प्रस्तावावर मोहर उमटवली आहे. तळोजा ते खांदेश्वर, पेंदर ते तळोजा एमआयडीसी, आणि खांदेश्वर ते नवी मुंबई विमानतळ हे दक्षिण नवी मुंबईतील तीन एकमेकांना जोडणारे मेट्रो मार्ग आहेत. नवी मुंबईतील सार्वजनिक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सिडकोने मेट्रो मार्गाची १२ वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यातील बेलापूर ते पेंदर या ११ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम मे २०११ रोजी सुरू झाले आहे. मात्र अनेक कारणास्तव हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. एक वर्षांपूर्वी सिडकोची धुरा डॉ. संजय मुखर्जी यांनी सांभाळल्यानंतर या ठप्प पडलेल्या प्रकल्पाला वेग आला आहे. या प्रकल्पाचे अभियांत्रिकी तसेच संचालनाचे काम राज्य सरकाच्या महामेट्रो कंपनीला देण्यात आले आहे. महामेट्रोच्या वतीने नागपूर व पुणे येथील मेट्रोची उभारणी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच पुण्यातील मेट्रोला हिरवा कंदील दाखवला आहे.
नवी मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील बहुतांशी सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांच्या अंतिम सुरक्षा प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत सिडको आहे. नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो मार्गालाही पंतप्रधान मोदी यांनी झेंडा दाखवावा असे प्रयत्न सुरू आहेत. पाच राज्यांतील निवडणूक कार्यक्रमांमुळे नवी मुंबई मुंबई जलवाहतूक लोकअग्रास्तव सुरु करण्यात आली आहे मात्र मेट्रोसाठी पंतप्रधान अपेक्षित आहेत. सुरक्षा आयुक्तांच्या प्रमाणपत्रानंतर रेल्वे बोर्ड हा प्रकल्प सुरू करण्यास अनुमती देणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र दिनाचा मुर्हत साधण्यात येणार आहे. नवी मुंबई मेट्रो येत्या काळात दृष्टिक्षेपात आल्यानंतर सिडकोने या मार्गाला जोडणारे तळोजा ते खांदेश्वर, पेंदर ते एमआयडीसी, आणि खांदेश्वर ते नवी मुंबई विमानतळ या तीन मार्गाचे प्रस्ताव तयार झाले असून सिडको संचालक मंडळाने त्याला मंजुरी दिली आहे.
राज्य सरकारच्या संमती नंतर हे प्रस्तावांवर केद्र सरकाचे शिक्कामोर्तब होणार आहे. या सेवेत केंद्र व राज्य सरकारचे अनुदान असल्याने ही संमती व अनेक परवानग्या घ्यावा लागणार आहेत मात्र या वर्षी या तिन्ही प्रकल्पांना सुरुवात होणार आहे. नवी मुंबई मेट्रो मार्ग तळोजानंतर पुढे कल्याण- डोंबिवलीपर्यंत जोडला जाणार असल्याने दक्षिण नवी मुंबईचा विकास अधिक झपाटय़ाने होण्यास मदत होणार आहे.