breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

प्रत्येक जिल्ह्यात महिला, नवजात शिशू रुग्णालये ; आरोग्य रुग्णालयांच्या बांधकामासाठी साडेसात हजार कोटी रुपये

मुंबई |

करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रासाठी जास्तीत जास्त निधी देतानाच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिला व शिशू रुग्णालयांची स्थापना करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. याचबरोबर सहा जिल्ह्यांत ट्रॉमा केअर सेंटर, मुतखडय़ाच्या शस्त्रक्रियेसाठी लिथोट्रेप्सी यंत्रणा उभारणी आणि कर्करोगाचे वेळेत व जलद निदान होण्यासाठी आठ आरोग्य मंडळांत मोबाइल कर्करोगनिदान वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाच्या संस्थांच्या श्रेणीवर्धनासाठी तसेच बांधकामासाठी साडेसात हजार कोटी रुपये आगामी चार वर्षांत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी हुडकोकडून तीन हजार ९४८ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार आहे. नियमित अर्थसंकल्पीय निधीशिवाय आगामी तीन वर्षांत आरोग्य सेवांवर ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील. मुंबई शहराबाहेर प्रथम दर्जाची शासकीय ट्रॉमा केंद्र नसल्यामुळे गंभीर जखमी रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा या ठिकाणी प्रत्येकी ५० खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी भांडवली खर्चाकरिता १०० कोटी, तर आवर्ती खर्चासाठी १८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या २०० खाटा असलेल्या सर्व रुग्णालयांत आगामी तीन वर्षांत मूतखडा (किडनी स्टोन) काढण्यासाठी लिथोट्रेप्सी उपचार पद्धती सुरू करण्यात येणार असून यासाठी दरवर्षी १७ कोटी ६० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मोतीिबदू शस्त्रक्रियेसाठी ६० रुग्णालयांमध्ये फॅको मशीन घेण्यात येणार असून यासाठी पहिल्या टप्प्यात २० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. ५० खाटांपेक्षा अधिक क्षमता असलेल्या रुग्णालयांमध्ये यांत्रिक धुलाई संयंत्रे आणि ३० खाटांवरील रुग्णालयांमध्ये स्वच्छता यंत्रे देण्यात येणार आहेत.

  • टाटा रुग्णालयासाठी रायगडमध्ये जमीन

टाटा कर्करोग रुग्णालयाला आयुर्वेदिक रुग्णालय व औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे १० हेक्टर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्करोगाचे वेळेत व जलद निदान व्हावे यासाठी आरोग्य विभागाच्या आठ मंडळांमध्ये आठ कर्करोगनिदान वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • अन्य तरतुदी

’ जालना येथे ३६५ खाटांचे नवीन प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यात येणार असून यासाठी ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

’ हिंगोली, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड जिल्ह्यात प्रत्येकी १०० खाटांचे स्त्री रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे.

’ गेल्या वर्षभरात आरोग्य विभागातील रुग्णालयातील खाटांची क्षमता १,३९२ ने वाढविण्यात आली असून विशेषोपचाराची सुविधा वाढविण्यात आली आहे.

’ शिव आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात टेलीमेडिसीन केंद्र स्थापन करण्यात येणार असून यामुळे ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.

’ पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्यात येणार असून यासाठी सेंट जॉर्ज येथे पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात येणार आहे.

’ नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण संस्था तसेच नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात येणार आहे.

’ पुणे शहराजवळ ३०० एकर जागेत अत्याधुनिक इंद्रायणी मेडिसिटी उभारण्यात येणार असून येथे एकाच ठिकाणी सर्व उपचार पद्धती उपलब्ध असतील. अशा प्रकारे ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत ठरेल. ’ सार्वजनिक आरोग्य विभागासाठी ३,१८३ कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे तर वैद्यकीय शिक्षण विभागासाठी २,१०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button