पिंपरी / चिंचवडपुणे

आत्महत्येचा प्रयत्न केलेली महिला तब्बल दहा दिवस उपचाराविना : महिलेचा मृत्यू, पतीला अटक

पिंपरी l प्रतिनिधी

पती चारित्र्यावर संशय घेऊन छळ करत असल्याने त्याच्या छळाला कंटाळून पत्नीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर पतीने पत्नीला तब्बल दहा दिवस उपचाराशिवाय घरीच ठेवले. त्यात पत्नीचा मृत्यू झाला. पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 5 डिसेंबर रोजी रात्री तळेगाव येथील लेबर कॅम्पमध्ये घडली.

बिरेंद्रसिंग जवाहरसिंग उईके (वय 24, रा. मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. सीतादेवी भोलासिंग मेश्राम (वय 20) असे मयत पत्नीचे नाव आहे. सीतादेवी यांच्या भावाने याप्रकरणी 22 डिसेंबर रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिरेंद्रसिंग याने फिर्यादी यांची लहान बहीण मयत सीतादेवी यांना एक वर्षापूर्वी पळवून नेले. त्या दोघांनी लग्न केले. लग्न केल्यानंतर बिरेंद्रसिंग याने पत्नी सीतादेवी यांच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. त्यावरून तो सीतादेवी यांना मानसिक व शारीरिक त्रास देत असे.

दरम्यान, ते दोघे कामानिमित्त तळेगाव दाभाडे येथे लेबर कॅम्प येथे राहण्यासाठी आले होते. बिरेंद्रसिंग याच्या त्रासाला कंटाळून 5 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता सीतादेवी यांनी पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. मात्र त्यांना बिरेंद्रसिंग याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले नाही.

5 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत त्याने जखमी पत्नीला घरीच ठेवले. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी बिरेंद्रसिंग याने सीतादेवी यांना त्याच्या आईकडे नेले. तिथून सीतादेवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सीतादेवी यांच्या मोठ्या भावाने याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी पती बिरेंद्रसिंग याला अटक केली आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button