breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

हिवाळी अधिवेशन गाजणार, अधिवेशनानंतर भाजपाच्या नेत्यांना…; नवाब मलिकांचा सूचक इशारा

मुंबई |

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी होणार असल्याचं म्हटलं आहे. मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सध्या राज्यात सुरु असलेल्या अमली पदार्थांच्या मुद्द्यावरुन माझ्यावर बरेच आरोप केले जातील असं मलिक यांनी म्हटलं आहे. मात्र त्याच वेळी त्यांनी आपण या आरोपांना उत्तर देताना अशी काही माहिती समोर आणणार आहोत की ज्यामुळे भाजपाच्या नेत्यांना कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. बऱ्याच लोकांचे बरेच कनेक्शन या ड्रग्ज प्रकरणात आहेत, असंही नवाब मलिक म्हणालेत. वानखेडेंच्या कुटुंबियांना गोवलं जात असल्याचा आरोप चुकीचा असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.

७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होत असून त्यामध्ये माझ्यावर भाजपाकडून बरेच आरोप आणि हल्लाबोल केला जाईल, असं मलिक यांनी म्हटलं आहे. सध्या मी कोणत्याही नेत्याच्या आरोपाला उत्तर देऊन प्रकरणावरुन लक्ष डायव्हर्ट करु इच्छित नाही. हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक नावं समोर येणार आहेत, असं मलिक म्हणालेत. मुंबईतील क्रूझ पार्टीच्या आयोजकांपैकी एक असणाऱ्या काशीफ खानला अटक झाल्यानंतर सखोल चौकशीमध्ये अनेकांची नावं समोर येतील. अनेकांच्या चेहऱ्यावरील मुखवटा हटेल. त्याच्याकडे किती लोकांचा पैसा आहे. त्याच्या माध्यमातून काय काय होतं आणि कोणत्या गोष्टी चालतात हे सुद्धा समोर येईल, असंही मलिक म्हणाले आहेत.

गुन्हा सिद्ध झालेला नसताना तुरुंगात ठेवणं हा अन्याय असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीचा फोटो मला रात्री दोन वाजता पाठवण्यात आला. हा फोटो ज्यांच्या आहे त्यांनी तो माझ्या माध्यमातून समोर यावा अशी इच्छा व्यक्त केली होती म्हणून मी तो सकाळी पोस्ट केला. मी समीर वानखेडेंची सध्याच्या पत्नीचं नाव कधीही घेतलं नाही, त्यांच्याबद्दल कधीही काहीही व्यक्तव्य केलं नाही. माझी लढाई ही परिवार, धर्माविरोधात नाहीय. आजही मुंबईतील तुरुंगामध्ये १०० हून अधिक लोक हे चुकीच्या पद्धतीने अटक करुन डांबण्यात आलेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

मी एनसीबीला एका अधिकाऱ्याने पाठवलेलं पत्र दिलं तर त्यावर कारवाई होणार नाही असं सांगण्यात आलं. पत्रावर नाव नसल्याने त्याची दखल घेतली जाणार नाही असं म्हटलं गेलं. मात्र त्या पत्रात नमूद केलेल्या २६ प्रकरणांची चौकशी केली जावी अशी आमची मागणी आहे. यापैकी २२ व्या प्रकरणामध्ये एका नायझेरियन व्यक्तीला कारण नसताना अडकवण्यात आल्याचं पंच कांबळे यांनीच स्पष्ट केल्याचंही मलिक म्हणाले. डीजी एनसीबींना मी पत्र पाठवलं आहे. सीबीसीच्या निर्देशांनुसार ही २६ प्रकरण बंद न करता त्याची चौकशी करा, गुन्हेगारांना पकडा हे तुमचं कर्तव्य, गुन्हेगार नसेल तर त्यांना अटक होता कामा नये, असं मलिक म्हणालेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button