Uncategorized

उद्धव-राज एकत्र येणार का? शर्मिला ठाकरे यांचं ‘मनसे’ उत्तर

पुणे: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष अक्षरश: खिळखिळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. शर्मिला ठाकरे रविवारी पुण्यात एका साड्यांच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी शर्मिला यांना, ठाकरे बंधू एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर शर्मिला यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाच ‘तुम्हाला असं वाटतं का?’, असा उलटा प्रश्न विचारला. तेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आमच्या वाटण्याने काही फरक पडत नाही, असे म्हटले. तेव्हा शर्मिला यांनीही ‘आमच्या वाटण्यानेही काही होत नाही’,असे सांगितले.

त्यावर एका पत्रकाराने उद्धव ठाकरे एकटे पडल्याचे म्हटले. तेव्हा शर्मिला यांनी म्हटले की, ‘त्यांना येऊ देत, साद घातली तर बघू’, असे सांगत तेथून काढता पाय घेतला. मात्र, त्यानंतर शर्मिला ठाकरे यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यामुळे आगामी काळात खरंच ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी काही प्रयत्न होतात का, हे पाहावे लागेल.

मंत्रिमंडळात महिलांना नक्की स्थान मिळेल: शर्मिला ठाकरे
मी असं ऐकलंय की, पुढील १० दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यावेळी मंत्रिमंडळात महिलांना स्थान नक्की मिळेल. कारण, भारतीय जनता पक्षात खूप चांगल्या महिला आहेत. पंकजा मुंडे आहेत. त्यामुळे एखादीला नक्कीच मंत्रिपद मिळेल. पंकजा मुंडे यांनी गेल्या टर्ममध्ये चांगले काम केले होते. महिला आणि बालविकास खाते एखाद्या महिलेकडेच गेले तर चांगले होईल, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले.

‘माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच राज्यातील रस्ते चांगले होतील’

महाराष्ट्रातील रस्ते आणि त्यावरील खड्डे हा प्रश्न राज्यात नेहमीच चर्चिला जातो. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे  यांनी देखील नाराजी व्यक्त करत “माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच राज्यातील रस्ते चांगले होतील”, असं वक्तव्य केलं आहे. त्या पुण्यात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शर्मिला ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button