breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही? आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितला ‘तो’ एक निकष, म्हणाले…

मुंबई |

राज्यात दररोज आढळणाऱ्या करोना रूग्णांचा आकडा साडेबारा हजाराच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी थेट आणि स्पष्ट उत्तर दिलं. राजेश टोपे यांनी राज्यातील करोना रूग्णांची आकडेवारी सांगत सध्या आढळणाऱ्या रूग्णांपैकी ९० टक्के रूग्ण केवळ ४ जिल्ह्यातील असल्याचंही नमूद केलं. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. राजेश टोपे म्हणाले, “३ जानेवारीचे आकडे पाहिले तर साडेबारा हजारपेक्षा अधिक करोना रूग्ण आहेत. मुंबईमध्येच ९ हजारच्या दरम्यान रूग्ण आहेत. ४ जिल्ह्यांमध्ये ९० टक्के रूग्ण आहेत. बाकीच्या राज्यात कुठेही इतके रूग्ण नाहीत. त्यामुळे जिथं रूग्ण नाहीत तिथं लॉकडाऊन येण्याचा संबंध येत नाही.”

  • “उपलब्ध बेडपैकी ४० टक्के बेड भरले तर लॉकडाऊनचा विचार”

“अद्याप राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत कोणताही विषय चर्चेला नाही. उपलब्ध बेडपैकी ४० टक्के बेड भरले तर लॉकडाऊनचा विचार करतो,” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

  • “५ दिवसात १० मंत्री आणि २० हून अधिक आमदार करोनाग्रस्त”

दरम्यान, अजित पवार म्हणाले होते, “आमचं पाचच दिवसांचं अधिवेशन होतं. या ५ दिवसात १० मंत्री आणि २० हून अधिक आमदार करोनाग्रस्त झालेत. हे अधिवेशन आणखी वाढवलं असतं तर निम्मे मंत्री आणि निम्मे आमदार करोनाग्रस्त झाले असते. यावरून सगळ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या. मी तर सभागृहातील व्यक्ती माझ्या बाजूचा आहे की विरोधी बाजूचा आहे हा भेदभाव केला नाही. सगळ्यांना आवाहन केलं.”

  • “फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका सगळीकडे २-३ लाख रूग्णांच्या पुढे आकडे”

“हे मोठं संकट जगावर आलं आहे. फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका सगळीकडे २-३ लाख रूग्णांच्या पुढे आकडे गेलेत. काही ठिकाणी बेड शिल्लक नाहीत. आपल्याकडे ज्यांना करोना होतो आहे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागत नाही. घरीच ठेऊन नीट औषधपाणी केलं, आराम केला तर बरे होतात. असं असलं तरी प्रत्येकाने काळजी घेणं सर्वांची जबाबदारी आहे,” असं पवारांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्राने तिसऱ्या लाटेची तयारी केली असल्याचंही नमूद केलं.

  • “यापुढे कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही”

अजित पवार म्हणाले, “राज्यात ओमायक्रोन आजाराची संख्या वाढल्याने राज्यात कोणत्याही कार्यक्रमाला गर्दी करू नये. लग्न समारंभ देखील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न करा. अन्यथा, ओमायक्रॉन आजाराचा धोका वाढल्यास राज्यावर लॉकडाऊन करण्याची देखील वेळ येऊ शकते.”

  • “…म्हणून कार्यक्रमाला १ तास आधीच जातो आणि उद्धाटन करतो”

यावेळी अजित पवारांनी कार्यक्रमाला गर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांना यापुढे कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमात मी उपस्थित राहणार नाही, असा सज्जड इशारा दिला. तसेच मी कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी, गर्दी कमी व्हावी यासाठी १ तास आधीच जातो आणि उद्धाटन करतो, असं नमूद केलं.

  • “लोक मास्क कमी लावत आहेत”

“आम्ही सकाळी नायगावला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती होती तेथे होतो. आम्ही अभिवादन करण्यासाठी गेलो होतो. तिथंही आम्ही सरपंच, आमदार अशी सर्वांशी बैठक घेतली. तिथं मी काही बाबी कबुल केल्या आहेत आणि मी त्या देणार आहे. मात्र, लोक मास्क कमी लावत आहेत. काहीजण मास्क न लावता तेवढ्यापुरता स्वतःचा रुमाल बांधतात आणि पुढे येतात. म्हणजे मास्क त्यांच्याकडे नाहीच आहे. असं होता कामा नये, सर्वांनी मास्क वापरला पाहिजे,” असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button