breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

संभाजीराजे छत्रपती मैदानात उतरणार, तुळजापूरमध्ये महत्त्वाची घोषणा करणार?

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षात आता संभाजीराजे छत्रपती यांचा प्रवेश होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या मुहूर्तावर आपल्या समर्थकांना तुळजापूरमध्ये जमण्याच आवाहन केले आहे. यादिवशी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्याकडून एखादी मोठी घोषणा होऊ शकते. त्यामुळे आता ठाकरे, शिंदे आणि भाजप यांच्यापाठोपाठ महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा दावेदार उभा राहण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी सकाळी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात. भेटूया ९ ऑगस्ट रोजी तुळजापूरला. त्यामुळे आता तुळजापूरमध्ये संभाजीराजे छत्रपती काय बोलतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. (Sambhajiraje Chhatrapati new tweet)

संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी स्वराज्य ही संघटना स्थापना केली होती. त्यावेळी संभाजीराजे यांनी आगामी काळात राजकारणात उतरण्याचे संकेत दिले होते. संभाजीराजे यांनी यावेळी राज्यसभा निवडणूक अपक्ष लढवण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाव्या जागेवर त्यांनी दावा सांगितला होता. मात्र, कोणत्याही पक्षाने पाठिंबा न दिल्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी शेवटच्या क्षणी राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती.
राज्यसभा निवडणुकीवेळी संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, अशी अट शिवसेनेने घातली होती. मात्र, संभाजीराजे यांनी पक्ष प्रवेश करण्यास नकार दिल्याने शिवसेनेने देखील संभाजी राजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याऐवजी संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. संभाजी राजे छत्रपती यांनी उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द फिरवला, असे म्हणत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. हीच निवडणूक पुढे जाऊन राज्यातील सत्तांतराचे कारण ठरली होती.या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे छत्रपती महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात तुळजापूर येथून होईल. काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठा वादंग निर्माण होऊन तुळजापूर शहर बंद देखील ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे जनभावना दुखावली गेली होती. यानंतर संभाजीराजे हे प्रथमच तुळजापूरला येत असून या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी क्रांती दिनी तुळजापूर येथून परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार असल्याचे ट्विट केल्याने राज्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून तुळजापूर येथे नेमके काय केले जाणार आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button