breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडपुणेराजकारणराष्ट्रिय

वाल्हेकरवाडी-स्पाईन रस्ता ते सांगवी-किवळे रुंदीकरणाला अखेर ‘गती’

  • डेअरी फार्मच्या जागा हस्तांतरणाला राज्य सरकारचा हिरवा कंदील
  • पशू संवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची बैठक

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी ।
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील वाल्हेकरवाडी चौक ते सांगवी-किवळे रस्त्यावरील डेअरी फार्म चौक ताथवडे पर्यंतचा ४५ मी. रूंद स्पाईन रस्ता विकसित करण्यासाठी जागा हस्तांतरण करणेबाबत व नदीवरील पूल बांधण्याच्या कामास राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला ‘गती’ मिळेल, अशी माहिती भाजपाचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी तथा माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी दिली.

पशू संवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुण्यातील विधान भवन येथे बैठक घेतली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, पशु संवर्धन विभागाचे अधिकारी, महापालिका अधिकारी उपस्थित होते. यावेळी ताथवडेतील डेअरी फार्ममधील जागा महापालिकेच्या प्रयोजनासाठी घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित होता. याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. त्याला यश मिळाले आहे.

बीआरटी विभागाचे सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे म्हणाले की, वाल्हेकरवाडी चौक ते सांगवी-किवळे रस्त्यावरील डेअरी फार्म चौक ताथवडेपर्यंतचा ४५ मी. रूंद स्पाईन रस्ता विकसित करण्यासाठी वळू माता प्रक्षेत्र ताथवडे येथील जागा हस्तांतरित करण्याच्या मोबदल्यात काही कामे प्रस्तावित केली आहेत. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे रस्ता रुंदीकरण काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

हिंजवडी व तळवडे आयटी पार्क जोडणारा रस्ता होणार प्रशस्त…

वाल्हेकरवाडी चौक ते सांगवी-किवळे रस्त्यावरील डेअरी फार्म चौक, ताथवडेपर्यंत सदरचा रस्ता हा सांगवी किवळे बीआरटी रस्ता (४५.००मी) व स्पाईन रस्ता (४५.०० मी) यांना जोडणारा जवळचा मार्ग असून, यामुळे चिंचवडगावातील वाहतूक कोंडी दूर होईल. तसेच, हिंजवडी आय.टी.पार्क व तळवडे आय.टी. पार्क यांना जोडणारा जवळचा मार्ग आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे यापूर्वी वळू माता प्रक्षेत्र ताथवडे येथील स.नं.२०, २४ व २५ मधील २.४० हेक्‍टर क्षेत्र जकात नाका, बोट क्लब व ४५ मी., ३४.३५ मी. रस्ता रुंदीकरणासाठी हस्तांतरित केलेली आहे.

महापालिका मैलाशुद्धीकरण प्रकल्प उभारणार…
दरम्यान, वाल्हेकरवाडी चौक ते सांगवी-किवळे रस्त्यावरील डेअरी फार्म चौक ताथवडे पर्यंतचा ४५ मी. रुंद स्पाईन रस्ता (क्षेत्र ४.४८ हेक्टर) व मैलाशुद्धीकरण प्रकल्पासाठी (क्षेत्र ०.७० हेक्टर) विकसित करण्याकरिता लागणाऱ्या एकूण (५.१८ हेक्टर) क्षेत्राचा महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त दर सूचीनुसार १८.५३ कोटी रुपये इतके मूल्यांकन होत असल्याचे कळविले आहे. यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात महापालिका सर्वसाधारण सभेत ठराव करुन जागेच्या बदल्यात पशुसंवर्धन प्रक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात विविध विकासकामे करण्याकरिता ३० कोटी रुपयांच्या रकमेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

वाकड आणि परिसरातील पाणी प्रश्न सुटणार…

वेगाने विकसित होणाऱ्या वाकड, ताथवडे, पुनावळे, काळाखडक यासह थेरगाव आदी भागातील पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी डेअरी फार्म येथील २ एकर जागेत उच्च क्षमतेचा जलकुंभ उभारण्याकरिता जागा महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करावी. याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. डेअरी फार्मची जागा ही सभोवतालच्या परिसराच्या तुलनेत उंचवट्यावर असल्यामुळे या जागेत जलकुंभ उभारल्यास नव्याने विकसित झालेल्या गृहनिर्माण सोसायटी आणि गावठाण भागातील पाणीपुरवठा सुरळीत करणे शक्य होणार आहे. त्यामुळे डेअरी फार्मच्या जागेवर जलकुंभ उभारणीच्या कामाला मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे, अशी माहिती शंकर जगताप यांनी दिली.

डेअरी फार्ममधील जागेच्या मोबदल्यात महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणाऱ्या विकासकामांची निविदा प्रक्रिया राबवण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी ना हरकत प्रत्र मिळावे, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. तसेच, जागा हस्तांतर करुन रस्त्याच्या कामाला गती देण्याची अपेक्षा आहे. तसेच, जलकुंभ उभारणीसाठी जागा उपलब्ध व्हावी. याबाबत पशू संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना सविस्तर मागणी केली होती. राज्य सरकारकडून सकारात्मक भूमिका घेतली असून, दि. ९ नोव्हेंबर रोजी नियोजित बैठकीत जागा हस्तांतरणाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री महोदय यांनी दिले आहे.

– शंकर जगताप, निवडणूक प्रभारी, भाजपा, चिंचवड विधानसभा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button