ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनातील भ्रष्टाचाराचा अहवाल का दडवलाय? आयुक्तांचा एकतर्फी कारभार; नगरसेवकांचा हल्लाबोल

पिंपरी चिंचवड | कोरोना काळात झालेल्या भ्रष्ट्राचाराचा अहवाल 20 दिवसात सभा पटलावर ठेवण्याचा महापौरांनी आदेश देऊन 1 वर्षे होत आले. त्याबाबत तीनवेळा आदेश देऊनही आयुक्तांनी अहवाल ठेवला नाही. महापौरांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली. अहवाल सभा पटलावर का ठेवला जात नाही?, आयुक्त कोणाला पाठिशी घालण्याचे काम करत आहेत? अहवाल का दडवलाय? आयुक्तांनी कोणत्या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे का? आयुक्तांनी शहराच्या प्रथम नागरिकाचा अवमान केला असून आयुक्तांचा एकतर्फी कारभार सुरु असल्याचा हल्लाबोल सर्वपक्षीय नगरसेवकांनी आज (गुरुवारी) महासभेत केला.भाजपच्या सीमा सावळे म्हणाल्या, ‘महापौरांचा आदेश आयुक्त मानत नाहीत. आदेश देऊनही कोरोना काळातील भ्रष्टाचार अहवाल सभा पटलावर ठेवला जात नाही. महापौर, महासभेच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जाते. शहराच्या प्रथम नागरिकांचा वारंवार अपमान केला जातो. आयुक्त एकतर्फी कारभार करतात. अहवाल सभा पटलावर ठेवला जात नाही. तोपर्यंत सभा कामकाज चालवू देऊ नका, आयुक्त नवीन आहेत म्हणून किती दिवस सोडून द्यायचे, कोणाला पाठिशी घालण्याचे काम आयुक्त करताहेत, हे त्यांनाच ठाऊक. लोकांच्या मड्यावरच्या टाळूवरचे लोणी खाणारे कोण-कोण आहेत हे सर्वांना कळू द्या, कोणत्याही पक्षाचे नगरसेवक असू द्या, कोणाला पाठिशी घालत नसाल तर अहवाल सादर करा. यापुढे नावासह बोलणार आहे. मास्कमध्ये कोण होते, जेवणात कोण होते. असे सगळे घोटाळे बाहेर काढेल असा इशारा देत जे जबाबदर असतील त्यांनी शिक्षा भोगावी’.

राष्ट्रवादीच्या मंगला कदम म्हणाल्या, महापौरांचा अपमान होऊ नये. त्या शहराच्या प्रथम नागरिक आहेत. भाजपने पावणे पाच वर्षात जे पेरले तेच उगवत आहे.भाजपचे संदीप वाघेरे म्हणाले, महापौरांनी कोरोना काळातील भ्रष्टाराचा अहवाल एप्रिल मध्ये 20 दिवसाच्या आत सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचा आदेश दिला होता. तो अहवाल अद्यापर्यंत सभा पटलावर का ठेवला नाही. 6 ते 7 महिने काय झाले कोणाला माहिती नाही. त्या अहवालात काय आहे, हे सभागृहाला कळले पाहिजे. कोणाला वाचविले जातंय, चुकांवर पांघरुन कशाला घालता. दुध का दुध, पाणी का पाणी झाले पाहिजे, भ्रष्टाचारी उघड झाले पाहिजेत.भाजपच्या आशा शेंडगे म्हणाल्या, महापौरांच्या आदेशाचे पालन केले नाही. सात महिने झाले. आदेशाची अंंमलबजावणी केली नाही. आयुक्तांनी महापौरांचा अवमान करुन शहरातील 25 लाख नागरिकांचा अवमान केला आहे. आयुक्तांचा निषेध करुन सभा तहकूब करावी.

भाजपचे विकास डोळस म्हणाले, कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले. नगरसेवक पोटतिडकीने बोलले. त्यावर महापौरांनी त्याचा अहवाल सभा पटलावर ठेवण्याचा आदेश दिला. परंतु, आयुक्तांनी एवढे महिने उलटूनही अहवाल सभा पटलावर ठेवला नाही. अहवाल सभा पटलावर ठेवण्यास आयुक्तांना कोणती अडचण आहे?

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, कोरोना काळात महापालिका प्रशासनाने चांगले काम केले. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. काही लोकांकडून सभागृहाची दिशाभूल केली जाते. त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button