Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

एकनाथ शिंदेंचे बंड तरीही शिवसैनिक शांत का?; जाणून घ्या

मुंबईः ‘आवाज कुणाचा’ ही तारस्वरात दिली जाणारी घोषणा आणि शिवसेना या चार अक्षरांच्या विरोधात गेलेला कुणीही असला तरी मागे-पुढे न पाहता त्याच्यासोबत केलेला राडा हे शिवसैनिकांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तरीही सध्या इतक्या मोठ्या बंडानंतरही शिवसैनिक शांत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटते आहे. शिवसैनिकांनी राडा केल्यास हीच संधी साधून राज्यात त्वरित राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. त्यानंतर सत्तेच्या सारीपाटावर खेळण्यासाठी एकही सोंगटी शिवसेना नेतृत्वाच्या हातात राहणार नाही. त्यामुळेच शिवसैनिकांनी मर्यादेतच शक्ती दाखवावी, असे शिवसेनेच्या शीर्षस्थ नेतृत्वाचे प्रयत्न आहेत.

शिवसेनेने छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे अशा अनेक मोठ्या नेत्यांचे बंड पाहिले आहे. भुजबळ यांच्या बंडाच्या वेळी तर बाळासाहेब ठाकरे अत्यंत जोशात होते. त्यामुळे भुजबळ यांना कित्येक दिवस भूमिगत व्हावे लागले होते. राणे यांना शिवसेनेची ही आक्रमकता माहीत असल्याने त्यांनी स्वतःच अधिक आक्रमकता दाखवली होती. मात्र, तरीही राणे यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झालेच होते. राज ठाकरे यांच्या वेळी ठाकरे या वलायामुळे शिवसैनिक आक्रमक झालेले नसले तरी मनसे विरुद्ध शिवसेना असाही राडा मुंबईने पाहिलेला आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी ३०हून अधिक आमदारांना घेऊन बंड करूनही ‘वरून’ कोणताही आदेश नसल्याने शिवसेना कार्यकर्त्यांतील अस्वस्थता वाढते आहे.

शिवसैनिकांना रस्त्यावर उतरवणे व राडा घालायला लावणे सोपे असले तरी त्यानंतर त्यावर नियंत्रण आणणे कठीण असल्यानेच शिवसैनिकांना जपून निषेध करण्याचेच आदेश आहेत. कारण, राड्याच्या निमित्ताने एकदा का हिंसाचार सुरू झाला की राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दाखवून केंद्र सरकारला राष्ट्रपती राजवट लावणे अधिक सोपे होणार आहे. तसे झाल्यास पुढचे सगळेच खेळ एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप ओढणाऱ्यांसाठी सोपे होणार आहेत. त्यामुळेच नेतृत्वाकडून ते आदेश देण्यात येत नसल्याने एका ज्येष्ठ शिवसेना नेत्याने ‘मटा’शी बोलताना सांगितले.

उद्धव यांच्या आवाहनानंतर शिवसैनिक भावनिक

उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून जनतेला केलेल्या आवाहनानंतर अनेक शिवसैनिक भावनिक झाले असून, ते मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याचे चित्रही अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ विभागप्रमुखाने ‘मटा’ला सांगितले की, शिंदे यांच्यासोबतच्या अनेकांना शिंदेंसोबत राहायचे नाही. शिवसैनिक चिडल्यास काहीही होऊ शकते. त्यातून त्या आमदारांविषयी गैरसमज होऊ शकतात, हीदेखील भीती आहे. त्यामुळेच शिवसैनिकांच्या रागाला शांत करण्याचेच आदेश आम्हाला पक्ष नेतृत्वाने दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button