breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

गृहखातं कोण चालवतं? अनिल देशमुख की अनिल परब? कारण…- देवेंद्र फडणवीस

मुंबई  |

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल(शनिवार) मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे, सध्या राज्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. भाजापाने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यभर निदर्शने सुरू केली आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, जोपर्यंत गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत भाजपाची आंदोलन थांबणार नसल्याचाही इशारा दिला आहे. तर, विधानसभेत गृहविभागाशी निगडीत प्रश्नांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ऐवजी शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब हेच जास्त उत्तर देत असल्याच्या पार्श्वभूमीवर देखील फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारला टोला लगावला आहे.

गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय, “या प्रकरणाची चौकशी होऊच शकत नाही. गृहखातं कोण चालवतं? अनिल देशमुख की अनिल परब? कारण, सभागृहात गृहविभागावर उत्तरं अनिल परब देतात. या नियुक्त्यांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा? हे स्पष्ट झालेच पाहिजे.” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे.

तसेच, “परमबीरसिंग यांच्या पत्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांना माहिती दिल्याचे सांगितले आहे. मग मुख्यमंत्री का बोलत नाहीत? परमबीरसिंग यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करणार असाल तर ते पापांवर पांघरूण घालण्यासारखे आहे. सचिन वाझे जितक्या गाड्या वापरत होते, त्यापैकी काही गाड्या नेमके कोण-कोण व्यक्ती वापरत होते, हेही स्पष्ट झाले पाहिजे. एनआयए किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे.” अशी देखील फडणवीस यांनी मागणी केलेली आहे.

“ही दलाली आणि लाचखोरी तेव्हाच थांबविली गेली असती, तर आज हा प्रसंग आला नसता. माझ्या माहितीप्रमाणे या दलालीचा संपूर्ण रिपोर्ट सरकारच्या रेकॉर्डवर इनवर्ड झालेला आहे. ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत. ते केवळ परमबीरसिंग यांचीच चौकशी करणार की गृहमंत्र्यांची सुद्धा? थोडक्यात विद्यमान गृहमंत्र्यांची चौकशी १५-२० वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलीस अधिकार्‍यांनी करावी, असे शरद पवार यांना सूचवायचे आहे का?” असा सवाल देखील फडणवीस यांनी केला आहे.

याचबरोबर “अनिल देशमुख यांचा राजीनामा आलाच पाहिजे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यांचा राजीनामा आल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे आंदोलन थांबणार नाही. सरकारचे कसे आहे… आम्ही भ्रष्टाचार करू, दुराचार करू, अत्याचार करू. फक्त विरोधक बोलले की, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू. आता अशा वाक्यांची आता आम्हाला सवय. त्याने फार काही फरक पडत नाही.” असं देखील फडणवीस यांनी म्हटलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button