breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ओमायक्रॉनचा धोका वाढत असतानाच मुंबईत डॉक्टरांचं काम बंद आंदोलन, आदित्य ठाकरेंनी चर्चेसाठी बोलवलं

  • OPD सेवेला फटका…

मुंबई |

देशाबरोबरच मुंबईमध्येही ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत असतानाच मुंबईमधील शीव येथील शासकीय रुग्णालयाबाहेर मार्डच्या निवासी डाॅक्टरांनी आज सकाळपासून आंदोलनाला सुरुवात केलीय. नीट पीजी काऊन्सिलिंग सतत पुढे ढकलण्यात येत असल्याने निवासी डाॅक्टरांनी संपाचं हत्यारं उपसलं आहे. डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेत मागण्या पूर्ण करण्यासाठी आता काम बंद आंदोलनाची हाक दिलीय.

राज्यातील सरकारी रुग्णालये आणि काॅलेजमधल्या बाह्यरुग्ण विभागातील डाॅक्टरांनी आजपासून हे आंदोलन सुरु केलंय. सरकारच्या धोरण निश्चिततेमध्ये समानता नसल्याने आपलं शैक्षणिक नुकसान होत असल्याने सोबतच ॲडमिशन प्रक्रिया लवकर पार पडत नसल्याने रुग्णालयातील इतर डाॅक्टर्सवर ताण येत असल्याने आक्रमक पवित्रा घेत हे आंदोलन सुरु करण्यात आल्याचं संपकरी डॉक्टरांनी म्हटलंय. सरकारी रुग्णालये आणि मेडिकल काॅलेजमधील इमर्जन्सी सेवा आणि ओपीडी बंद राहणार असल्याने रुग्णांचे हाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • मार्डच्या डॉक्टरांचा प्रश्न काय?

देशात निवासी डॉक्टरांच्या एकूण ५० हजार जागा आहेत. राज्यामध्ये निवासी डॉक्टरांच्या पहिल्या वर्षाच्या एकूण अडीच हजार जागा आहेत. आपल्या मागण्यासंदर्भातील पत्र केंद्र तसेच राज्य सरकारला पाठवण्यात आलं असल्याचं आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. तसेच केंद्रीय आरोग्य सचिवांनाही पत्र पाठवण्यात आलं आहे.

देशातील आरोग्य व्यवस्थेपैकी ६० टक्के आरोग्य व्यवस्था ही मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून संभाळली जाते. यामध्ये खासगी आणि सरकारी कॉलेजचाही समावेश होतो. सध्या परिस्थिती अशी आहे की जिथे १०० डॉक्टर काम करतात त्या ठिकाणी ६० डॉक्टरच कामावर आहेत. नीट पीजी काऊन्सिलिंग सतत पुढे ढकलण्यात येत असल्याने पुढील बॅच मागील दोन वर्षांपासून आरोग्य सेवेमध्ये रुजू झालेली नाही. त्यामुळेच मागील दोन वर्षांपासून १०० च्या जागी ६० डॉक्टर काम करतायत अशी परिस्थिती असल्याचं आंदोलक डॉक्टर सांगत आहेत.

आरोग्य सेवा ही आप्तकालीन सेवा आहे. त्यामुळे न्यायलयातील प्रकरण तातडीने निकाली काढून आंदोलनकर्त्या डॉक्टरांना तिसरी बॅच द्यावी आणि डॉक्टरांची संख्या वाढवून यंत्रणेवरील ताण कमी करावा अशी आंदोलकांची मागणी आहे. करोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असताना कमी मनुष्यबळामध्ये आरोग्य यंत्रणेला काम करायला लावणं चुकीचं आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

  • चर्चेसाठी आमंत्रण

राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणामध्ये सरकारच्या वतीने चर्चा करण्यासाठी संपकरी डॉक्टरांना चर्चेसाठी आज सायंकाळी पाच वाजता ‘सह्याद्री’ भवनावर बोलवलं आहे. मुंबईवरील आरोग्य यंत्रणेचा भार ४०० निवासी डॉक्टरांवर आहे. मुंबईला आणखी २०० निवासी डॉक्टरांची गरज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button