Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

पूर्व द्रुतगती मार्गावरील छेडानगर जंक्शनच्या वाहतूककोंडीतून मुक्त कधी होणार; समोर आली महत्त्वाची अपडेट

मुंबईः पूर्व द्रुतगती मार्गावरील छेडानगर जंक्शनच्या वाहतूककोंडीतून मुक्तता होण्यासाठी मुंबईकरांना आणखी वर्षभराची वाट पाहावी लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) राबविण्यात येणाऱ्या छेडानगर सुधारणा प्रकल्पातील मानखुर्द ते ठाणे वाहतूकीसाठी उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम डिसेंबर २०२२पर्यंत पूर्ण होणार आहे. सायन ते ठाणे दिशेकडील वाहतुकीसाठी उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम पुढील १० ते १२ महिन्यात पूर्णत्वास जाणार आहे. त्यानंतर छेडानगर जंक्शन सिग्नलमुक्त होऊन कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे. तसेच प्रवासाच्या वेळेत सुमारे अर्ध्या तासाची बचत होणार आहे.

पूर्व द्रुतगती मार्गावर छेडानगर जंक्शनला मानखुर्दवरून, पुर्व मुक्त मार्गावरून वाहने येतात. ठाण्याकडून सांताक्रूझ-चेंबूर लिंक (एससीएलआर) कडे जाणारी वाहनेही या जंक्शनला दाखल होतात. तसेच ठाणे आणि मुंबईच्या दिशेनेही मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. परिणामी छेडानगर जंक्शनला वाहनांना मोठ्या कोंडीला सामोरे जावे लागते. ही कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरडीएने २०१८ मध्ये छेडानगर सुधारणा प्रकल्प हाती घेतला. त्याद्वारे तीन उड्डाणपूल आणि एका अंडरपासची उभारणी करण्यात येत आहे. यातील ठाण्याकडून येणाऱ्या वाहनांना ”एससीएलआर”वर जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे आणि कामराजनगर येथील सबवेच्या पहिला टप्प्याचे कामही पूर्ण झाले आहे. हे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत मानखुर्दकडून येणाऱ्या वाहनांना विनाअडथळा ठाण्याच्या दिशेला जाण्याकरिता उभारण्यात येणाऱ्या उड्डाणुपलाचे ७१ टक्के काम पूर्ण झाले आहे. याआधी उड्डाणपुल जून २०२२ पर्यंत सुरू होणार होता. मात्र याला विलंब झाला असून उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०२२ उजाडणार आहे. सायनकडून येणाऱ्या वाहनांना ठाण्याच्या दिशेला जाण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे २१ टक्के काम झाले आहे. पालिकेच्या नाल्याचे काम सुरू असल्याने या उड्डाणपुलासाठी मार्गिका बंद करण्यात एमएमआरडीएला अडचणी येत होत्या. तसेच वाहनांची कोंडी टाळण्यासाठी हा मार्ग पूर्ण बंद करणे शक्य नसल्याने कामाला विलंब झाला. परिणामी उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी १० ते १२ महिन्यांचा कालावधी लागण्याची चिन्हे आहेत.

रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळण्याची चिन्हे
राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यावर आता रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळण्याची चिन्हे आहेत. स्वामी समर्थनगर ते विक्रोळी ”मेट्रो ६” मार्गिकेच्या कारशेडचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. कांजुरमार्ग येथे ”मेट्रो ३”चे कारशेड हलविल्यामुळे या मेट्रोच्या कारशेडची जागाही न्यायालयीन वादात अडकली आहे. कंत्राटदार आर्थिक गर्तेत सापडल्याने वडाळा ते कासारवडवली ”मेट्रो ४”च्या तीन पॅकेजचे थांबलेले होते. त्यामुळे या मार्गाला विलंब झाला आहे. आता कंत्राटदाराने उपकंत्राटदाराची नेमणूक केली आहे. त्याच्याकडून वेगाने काम पूर्ण करण्यासाठी नव्या सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button