breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

संभाजीराजे आणि उद्धव ठाकरेंमध्ये नेमकं काय ‘ठरलंय’? कसा निघू शकतो मधला मार्ग?, वाचा…

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेचा सस्पेन्स वाढतच चालला आहे. तोडगा निघण्याऐवजी विविध नेत्यांच्या प्रतिक्रियांनी तिढा वाढतोच आहे. कारण शिवसेनेची ऑफर धुडकावून संभाजीराजे थेट कोल्हापूरला निघून गेले. इकडे मुंबईत सेना नेत्यांची सहावा उमेदवार देण्याबाबत खलबतं सुरु झाली. त्यात कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक संजय पवार यांचं नाव चर्चेत आलं. अखेर आज संभाजीराजेंनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. ‘पुढे काय करायचं याबद्दल उद्धवजींचं आणि आमचं ठरलंय’, अशी सूचक प्रतिक्रिया देत संभाजीराजेंनी आणखीनच सस्पेन्स वाढवला.

दुसरीकडे संभाजीराजे बोलत असताना त्याचवेळी राऊत माध्यमांशी बोलत होते. “संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. म्हणजे त्यांच्याकडे ४२ मतं असतील. आम्ही सेनेचा दुसरा उमेदवार उभा करणार आणि निवडून आणणार, उद्धवजी दुसऱ्या उमेदवाराचं नाव स्वत: जाहीर करतील”, असं म्हणत राऊतांनी दुसऱ्यांदा संभाजीराजेंच्या उमेदवारीचा निकाल लावला. एकीकडे संभाजीराजे म्हणतात, “आमचं ठरलंय” तर दुसरीकडे राऊत म्हणतात, “आम्हीच दुसरी जागा लढवणार…” त्यामुळे सहाव्या जागेचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे. परंतु संभाजीराजेंच्या ‘आमचं ठरलंय’, म्हणण्याचा काय अर्थ आहे?, संभाजीराजेंचं आणि उद्धव ठाकरेंचं काय ठरलेलं असू शकतं?, याचा घेतलेला मागोवा……

‘शिवबंधन बांधा आम्ही उमेदवारी जाहीर करतो’, अशी खुली ऑफर शिवसेनेने दिली होती. मात्र संभाजीराजेंना शिवसेनेत प्रवेश करायचा नाहीये. कोणत्याही पक्षाचं लेबल आपल्यावर न लावता त्यांना राज्यसभेवर जायचं आहे. त्यातूनच मग ‘महाविकास आघाडी पुरस्कृत’ असा मधला मार्ग संभाजीराजेंनी शिवसेनेला सांगितला. मात्र ‘शिवसेनेचे अधिकृत उमेदवार’ या लाईनवर शिवसेना नेते ठाम होते. मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये संभाजीराजे आणि सेना नेत्यांमध्ये हीच चर्चा झाली. राजे आणि सेना नेते आपापल्या भूमिकांवर ठाम होते. चर्चेतून मार्ग काही निघाला नाही. राजेंनी सोमवारी पहाटेच मुंबई सोडून कोल्हापूरकडे प्रयाण केलं.

संभाजीराजेंनी सेनेची ऑफर धुडकावल्यानंतर सोमवारी विविध सेना नेत्यांच्या बैठकी पार पडल्या. या बैठकीतून सहाव्या जागेवर अनेक नेत्यांची नावे चर्चेत आली. चंद्रकांत खैरे, आढळराव पाटील, उर्मिला मातोंडकर आणि कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक संजय पवार यांच्या नावांची प्रामुख्याने चर्चा झाली. परंतु संभाजीराजेंच्या विरोधात कोल्हापुरातील सर्वसामान्य कट्टर शिवसैनिक संजय पवार यांचं नाव सर्वांत पुढे होतं. शिवसेनेचं हे मोठं धक्कातंत्र असल्याची चर्चा झाली. संजय पवार यांचं नाव पुढे करुन संभाजीराजेंना शह देण्याचा प्रयत्न शिवसेना करत असल्याचंही राजकीय वर्तुळात बोललं गेलं. तसेच राजे विरुद्ध सर्वसामान्य असा मेसेजही देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा झाली.

कालच्या दिवसभरातील मोठ्या घडामोडींनंतर अखेर आज संभाजीराजेंनी माध्यमांशी संवाद साधला. संभाजीराजेंनी मीडियाला केवळ चार ओळीत माहिती दिली. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. पुढे काय करायचं आहे, हे आमचं ठरलंय. उद्धवजी, छत्रपती घराण्याचा सन्मान करतील, धन्यवाद….” अशी सस्पेन्स वाढवणारी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली. परंतु संभाजीराजेंच्या ‘आमचं ठरलंय’, म्हणण्याचा काय अर्थ आहे?, संभाजीराजेंचं आणि उद्धव ठाकरेंचं काय ठरलेलं असू शकतं? हे आपण पाहुयात…

शिवसेनेचं म्हणणं संभाजीराजेंनी अधिकृत सेना उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करावा. तर मविआ पुरस्कृत म्हणून राज्यसभेवर जायला संभाजीराजे तयार आहेत. आता दोन दिवसांतल्या वेगवान घडामोडींनंतर संभाजीराजे आणि शिवसेनेने एक पाऊल मागे घेत ‘शिवसेना अधिकृत’ नाही तर ‘शिवसेना पुरस्कृत’ म्हणून शेवटच्या क्षणी संभाजीराजे राज्यसभेवर जाण्यासाठी तयार होतील, अशी शक्यता सूत्रांनी बोलून दाखवली. संभाजीराजे आणि संजय राऊत एकाचवेळी माध्यमांसमोर आले आणि दोघांनीही उद्धव ठाकरे निर्णय जाहीर करतील, असं म्हटलं. दोघांच्याही बोलण्यातून उद्धव ठाकरेच निर्णय जाहीर करतील, असा समान धागा आला. त्यामुळे तर चर्चांना आणखीनच हवा मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button