breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय

देशात युद्धजन्य परिस्थिती, दोन दिवसांचे अधिवेशन बोलवा- संजय राऊत

मुंबई |

देशात सध्या करोनाने कहर केला असून याचा फटका महाराष्ट्रासह अनेक राज्यांना बसला आहे. महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्यात आले असून दिल्लीसोबत इतर अनेक राज्यांनीही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये बेड्स, व्हेंटिलेटर तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. यासाठी अनेक राज्यांनी केंद्राकडे मदतही मागितली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तसंच दोन दिवसांचं अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “देशात अभुतपूर्व आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडे गोंधळ आणि चिंतेचं वातावरण आहे. बेड नाही, ऑक्सिजन नाही आणि लसदेखील नाही. सगळीकडे गोंधळच गोंधळ आहे. या स्थितीवर चर्चा करण्यासाठी संसेदचं किमान दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं. जय हिंद!”

भारतात करोना रुग्णांचा संसर्ग दर हा गेल्या बारा दिवसांत दुप्पट झाला असून तो आता १६.६९ टक्के झाला आहे. भारतात २ लाख ६१ हजार ५०० नवीन रुग्ण सापडले असून रविवारी १५०१ मृत्यूंची नोंद झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात, तमिळनाडू, राजस्थान या राज्यांत नवीन रुग्णांचे प्रमाण ७८.५६ टक्के आहे. गेल्या बारा दिवसांत रुग्णांचा दैनंदिन संसर्ग दर हा दुप्पट होऊन तो ८ टक्क्य़ांवरून १६.६९ टक्के झाला आहे. आठवड्यातील राष्ट्रीय संसर्ग दर हा गेल्या महिन्यात ३.०५ टक्के होता तो आता १३.५४ टक्के झाला आहे. छत्तीसगडमध्ये साप्ताहिक संसर्ग दर ३०.३८ टक्के आहे. गोव्यात तो २४.२४ टक्के, महाराष्ट्रात २४.१७ टक्के, राजस्थानात २३.३३ टक्के व मध्य प्रदेशात १८.९९ टक्के होता. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १८ लाख १ हजार ३१६ असून हे प्रमाण गेल्या २४ तासांत संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या १२.१८ टक्के आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक व केरळ या राज्यांत एकूण ६५.०२ टक्के उपचाराधीन रुग्ण आहेत. एकूण १ कोटी २८ लाख ९ हजार ६४३ रुग्ण बरे झाले आहेत. २४ तासांत बरे झालेल्यांची संख्या १ लाख ३८ हजार २४३ झाली आहे. दहा राज्यांत एकूण मृत्यूंच्या ८२.९४ टक्के मृत्यू झाले असून ही संख्या १५०१ आहे. महाराष्ट्रात ४१९ बळी गेले असून दिल्लीत बळींची संख्या १६७ आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button