breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#WAR AGAINST CORONA: राज्यपालांनी साधला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद; पुणे विभागाच्या उपाययोजनांबाबत समाधान

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

पुणे 6- कोरोनाविरुध्दच्या लढयात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा खूप चांगले  काम करीत असून प्रशासकीय यंत्रणेबरोबरच अन्य स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करुन घ्यावे असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.

          विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी राज्यपालांनी राजभवन मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधत कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी केलेल्या उपाययोजना, मदत कार्य यांचा यावेळी त्यांनी आढावा घेत मार्गदर्शन केले.

          राज्यपाल म्हणाले, कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासन, पोलिसदल, आरोग्य विभाग, एनजीओ तसेच अनेक सामाजिक संस्था हिरिरीने काम करत आहेत. राज्यातील ज्येष्ठ नागरिक, कामगार, मजूर यांच्यापर्यंत मदतकार्य पोहचवण्याबरोबरच बेघर, बेरोजगारांच्या समस्यांचाही जलद निपटारा करावा. या सर्व घटकांना अन्न, निवारा, याबरोबरच औषधोपचार अशा सुविधा वेळेवर पोहचवाव्यात. सफाई कर्मचाऱ्यांची या परिस्थितीत मोठी भूमिका आहे. डॉक्टर्स, नर्सेस,पोलिस, सफाई कर्मचारी यांचा उत्साह वाढवण्याची गरज आहे. त्यांना अधिक प्रोत्साहित करावे, अशा सूचनाही यावेळी राज्यपालांनी दिल्या.

          पुणे विभागात कोरोना विषाणूच्या  प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली. सद्यस्थितीची माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात आज अखेर एकूण 2450 बाधितांचे सॅम्पल्स घेतले. यापैकी 149 जण पॉझिटिव्ह व 2146 जण निगेटिव्ह आढळले आहेत. यापैकी 26 जण बरे होवून घरी गेले आहेत. मृत्यूंची संख्या 6 इतकी आहे. आजअखेर विभागातील एकूण 2444 संशयित व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी 2150 व्यक्तींना सोडले असून 292 व्यक्ती अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत. विभागातील दाखल झालेल्या 85 हजार 340 प्रवाशांपैकी 36 हजार 070 प्रवाशांचा फॉलोअप पूर्ण झाला असून अजून 49 हजार 270 प्रवासी शिल्लक आहेत.

          पुणे विभागात एकूण 21 कोरोना चाचणी सुविधा केंद्रे आहेत. विभागातील खाजगी, शासकीय हॉस्पिटलसाठी पीपीई कीट पुरवण्यासठी व्यवस्था केली असून हाफकीन संस्थेमार्फत या कीटची तपासणी व खात्री केली जात आहे. कामगार, मजूर, बेघर यांच्या सद्यस्थितीबद्दल सांगताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात मजूर स्थलांतरित कामगार व बेघर यांच्यासाठी कायमस्वरुपी 61 कॅम्प असून त्याची क्षमता 4360 व्यक्तींसाठी आहे. तर खाजगी कॅम्प 505 असून त्यामध्ये 26585 व्यक्तींची क्षमता आहे. असे विभागांतर्गत एकूण 566 कॅम्प असून त्याची क्षमता 30 हजार 945 इतकी आहे. कामगार, मजूर यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. विभागातील साखर कारखान्यांच्यावतीने अन्न पुरविले जात आहे. इतर राज्यातील एकूण 246 व्यक्ती विभागात अडकलेल्या असून जिल्हा स्तरावरुन  त्याबाबत योग्य ती कार्यवाही सुरु आहे. विभागातील शेतीची कापणीची, काढणीची कामे सुरु आहेत. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना शेतमालाच्या भावाबाबत  समस्या येवू नयेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बाजार समिती मार्फत भाजीपाला व फळे यांची बाजारपेठ सुरु राहण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. दूधाच्या मागणीत झालेली घट लक्षात घेता दूधापासून  पावडर बनवण्याचे प्रमाण 40 टक्क्याहून 80 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. सर्व बाजार समित्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्ग व प्रादूर्भाव टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. भाजीपाल्याची आवक सुरळीत असून धान्याचा साठा पुरेसा असून तुटवडा नसल्याचे त्यांनी सांगितले.

          दिल्ली मरकजवरुन परत आलेल्या व्यक्तींबद्दल माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात सध्या एकूण 661 व्यक्ती असून त्यापैकी 299  व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. 49 व्यक्ती या महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात असून 205 व्यक्ती महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांमध्ये आहेत. अजून 107 व्यक्तींचा शोध सुरु आहे. विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये 9 स्वयंसेवी संस्था, एनजीओ कार्यरत असून रिलीफ कॅम्प मधील व्यक्तींना 330 एनजीओ जेवणाची व्यवस्था पुरवित आहेत. लष्कराच्या सदर्न कमांडच्या सुविधा  राखून ठेवण्यात आल्या आहेत. जैविक कचऱ्याच्या योग्य निर्मूलनासाठी उपाययोजना केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

          यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम  यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना बाबतची सद्यस्थिती व उपाययोजनांची राज्यपालांना विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. भविष्यात बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहित धरुन उपाययोजना केल्या जात आहेत. आयसोलेशन व आयसीयू व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात येत आहे. डॉक्टर्स व स्टाफची पुरेशी संख्या असून त्यांना आवश्यक सुविधा, साहित्य पुरविण्यात येत आहे. सर्वसामान्यांना लॉकडाऊनमुळे त्रास होवू नये, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील कामगारांच्या कॅम्पमध्ये असलेल्या कामगार, मजूर वर्गाला जेवण देण्यासाठी कामगार विभागाने व्यवस्था केली आहे. कामगारांचे स्थलांतर न होण्याबाबत दक्षता घेतली  जात आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी कामगारांच्या जेवणाची व्यवस्था केली असून 145  एनजीओ मार्फत 1 लाख 15 हजार व्यक्तींना जेवण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शिधापत्रिका नसलेल्यांसाठी सामाजिक संस्था, एनजीओ तर्फे  भोजन व्यवस्था केली आहे.  कोणतीही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांना दूध, भाजीपाला  अन्नधान्य यांचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button