breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“एकनाथ खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय”; ईडी कारवाईवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया

मुंबई |

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सध्या सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) कारवाई केली जात असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी एकनाथ खडसेंना टोला लगावताना यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचं म्हटलं आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“एकनाथ खडसे ईडीची सीडी लावणार म्हणाले होते. त्या सीडीची मी वाट पाहतोय,” असा टोला राज ठाकरेंनी लगावला. “काँग्रेसचं सरकार होतं तेव्हाही असाच वापर करण्यात आला होता. भाजपाचं सरकार आल्यानंतर तेदेखील वापर करत आहेत. ही काही तुमच्या हातातली बाहुली नाही जिचा वापर तुम्हाला नको असलेला माणूस संपवण्यासाठी करायचा. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अशाप्रकारे करुन चालणार नाही. ज्यांनी गुन्हे केलेत ते मोकाट सुटले आहेत,” असं राज ठाकरे म्हणाले.

  • आरक्षणावरुन फक्त माथी भडकावणार का ?

“राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचं सरकार असताना मराठा आरक्षणासाठी एक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्व पक्षांचे नेते त्यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी मी सगळ्यांनाच मान्य आहे तर मग अडकलंय कुठे असं विचारलं होतं. फक्त मुद्दा उपस्थित करायचा आणि माथी भडकावायची एवढाच उद्योग आहे का? ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही केंद्र, राज्य सरकार सर्वांना मान्य आहे तर अडलंय कुठे?,” अशी विचारणा राज ठाकरेंनी केली. सर्वांना मान्य आहे त कोणी अडवलं आहे? अशी विचारणा करताना राज ठाकरेंनी कोर्टात व्यवस्थित बाजू का मांडली जात नाही असंही विचारलं. तसंच सगळ्यांना व्यासपीठावर आणून चर्चा केली पाहिजे अशी मागणी केली.

  • सरकारचा कारभार पहायला मिळालेलाच नाही…

निवडणुकांच्या तयारीसाठी आलो असल्याचं मान्य करताना राज ठाकरेंनी सगळ्याच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत त्यामुळे काय होईल याची कल्पना नसल्याचं म्हटलं. तसंच लॉकडाउनच्या काळात सरकारचा कारभार पहायला मिळालेलाच नाही. त्यामुळे समाधान कशावर व्यक्त करावं? असा टोलादेखील लगावला.

  • माझा राज मोरे होणार नाही…

“मी नवी मुंबई विमानतळाला नवं नाव देण्याची मागणी केलेली नाही. उद्या जर मी पुण्यात शिफ्ट होण्याचा विचार केला तर माझ नाव राज मोरे होणार नाही. (मनसेच्या शहर अध्यक्ष वसंत मोरे यांच नाव आहे). त्यामुळे मुंबई विमानतळ शिफ्ट होत असेल तर नाव कसं बदलेल?,” अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली.

  • राणेंना फोन केला होता…

“नारायण राणेंना फोन केला होता, मात्र त्यांचा आणि त्यांच्या मुलांचादेखील फोन बंद होता. त्यामुळे मी एक दोन दिवसात फोन करेन,” असं राज ठाकरेंनी सागितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button