क्रिडाताज्या घडामोडी

मास्क घातलं नाही म्हणून विराट कोहलीच्या सहकाऱ्याला दिल्ली पोलिसांकडून मारहाण?; खेळाडू म्हणाला, “कार थांबवून…”

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातून खेळलेल्या भारतीय खेळाडूला दिल्ली पोलिसांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळलेल्या विकास टोकसला दिल्ली पोलिसांनी २६ जानेवारी रोजी बेदम मारहाण केली. या मारहाणीदरम्यान विकासच्या डोळ्याखाली गालावर बुक्का मारण्यात आल्याचा आरोप केला आहे. २०१६ मध्ये आरसीबीकडून खेळलेल्या विकासने यासंदर्भात दिल्ली पोलीस मुख्यालयामध्ये तक्रार दाखल केलीय.

विकासने केलेल्या दाव्यानुसार प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी रोजी त्याच्या गावाजवळ काही पोलिसांनी त्याची गाडी थांबवली आणि दोन हजार रुपयांची मागणी केली. मास्क घातलं नाही म्हणून हा दंड द्यावा लागेल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. याला विकासने विरोध केला असता ते पोलीस कर्मचारी जबरदस्तीने त्याच्या कारमध्ये बसले आणि त्याला शिवीगाळ करु लागले. याचदरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने विकासच्या चेहऱ्यावर बुक्का मारल्याचा आरोप त्याने केलाय. हा सर्व प्रकार भीकाजी कामा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलाय.

प्रजासत्ताक दिनी दुपारी १२ च्या सुमारास मित्राच्या घरुन स्वत:च्या घरी विकास परत येत असतानाच ही मारहाण झाल्याचा दावा केला जातोय. विकासने दिलेल्या माहितीनुसार नंतर पोलीस त्याला पोलीस स्थानकामध्ये घेऊन गेले आणि हा रायफल घेऊन पळत असल्याचा आरोप त्याच्यावर केला. पोलिसांनी त्याचा फोनही खेचून घेतला. त्यानंतर पोलीस स्थानकामधील एका पोलीस अधिकाऱ्याने प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसांकडून चूक झाल्याचं सांगत विकासला सोडून दिलं. त्यानंतर विकासने डीसीपी आणि सीपी यांना ईमेलवरुन तक्रार केलीय. डोळ्याखाली बुक्का मारणाऱ्या आणि त्याच्यासोबतच्या अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करावं अशी मागणी विकासने केलीय.

साऊथ वेस्ट दिल्लीचे डीसीपी गौरव शर्मा यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. विकासला तपासणीसाठी थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर विकासने एका पोलीस हवालदाराने राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटूला रोखण्याची हिंमत कशी केली असं म्हणत विकासने गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याचा दावा शर्मा यांनी केलाय. त्यानंतर विकासला पोलीस स्थानकात घेऊन जाण्यात आलं. येथे विकास आणि त्याच्या सासऱ्यांनी लेखी माफीनामा पोलिसांना दिल्यानंतर विकासची सुटका करण्यात आली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button