breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन

पुणे – मराठी ज्येष्ठ नाट्य आणि सिनेअभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोघे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, चिरंजीव अभिनेते शंतनू आणि सून अभिनेत्री प्रिया मराठे असा परिवार आहे.

सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे ६ नोव्हेंबर १९२९ रोजी श्रीकांत मोघे यांचा जन्म झाला होता. श्रीकांत मोघे हे नाट्य, चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेता याबरोबरच ते चित्रकार व वास्तुविशारद, उत्तम सुगम संगीत गायकही होते. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे श्रीकांत मोघे यांचे वडील कीर्तनकार होते. तसेच दिवंगत कवी सुधीर मोघे त्यांचे कनिष्ठ बंधू होत.

हसतमुख चेहऱ्याने प्रत्येकाचे स्वागत करणारे आणि प्रत्येकाशी जिव्हाळ्याने संवाद साधणारे मोघे काही वर्षांपासून आजारी होते. व्याधींमुळे त्यांना व्हिलचेअरमधून फिरावे लागायचे. अशा परिस्थितीतही नाउमेद न होता ते सभा सोहळ्यांना आवर्जून हजेरी लावून वातावरण प्रफुल्लीत करायचे. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण सांगलीतील विलिंग्डन कॉलेजमध्ये झाले होते. बीएस्सीसाठी ते पुण्याच्या स.प.कॉलेजात गेले. मुंबईत त्यांनी बी.आर्च. ही पदवी घेतली. शाळेत असतानाच ते नाट्यअभिनयाकडे वळले. पुणे व मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ख्यातनाम नाटककार भालबा केळकर यांच्या ‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले. लग्नाची बेडी, अंमलदार अशी नाटके त्यांच्या बहारदार अभिनयाने गाजली. त्यांनी ६० हून अधिक नाटके आणि ५० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. तसेच श्रीकांत मोघे यांनी आपल्या नाट्यप्रवासावर आधारित ‘नटरंगी रंगलो’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. ‘स्वामी’ मालिकेतील त्यांनी साकारलेल्या राघोबादादांच्या भूमिकेला रसिकांची दाद मिळाली. सांगली येथे २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. एकेकाळी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांत ‘चॉकलेट हिरो’ अशी प्रतिमा असलेले नायक म्हणून श्रीकांत मोघे यांच्याकडे पाहिले जायचे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button