पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या आदेशानंतर मनसैनिक राज्यभर आक्रमक झालेले आहेत. काल दिवसभर राज्यभरात पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड केली. असे असताना दुसरीकडे मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे हे मात्र तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. पुणे शहरात मनसे आक्रमक पवित्र्यात असताना वसंत मोरे शहरातून निघून गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
वसंत मोरे हे पक्षाला रामराम ठोकणार, अशा चर्चा सुरु असतानाच पुन्हा एकदा वसंत मोरे यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण दिले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाही, तर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय. साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मशिदींच्या प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली. आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करू असे त्यांनी मला सांगितले, असे सांगत मोरे यांनी आफल्या फेसबुक पोस्ट द्वारे प्रभागातील सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक आभार मानले आहेत.
दरम्यान, मुंबईतील गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याबाबत वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावर ठाकरे यांच्या भूमिकेशी आपण सहमत नसल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले होते. राज ठाकरे यांच्या वक्तव्याला सहमत नसल्याने त्यांच्याकडे असलेले पुण्याचे शहराध्यक्षपद काढून घेण्यात आले होते. यानंतर वसंत मोरे राज ठाकरेंना भेटायला गेले आणि त्यावेळी त्यांच्यात काय चर्चा झाली हे बाहेर आले नव्हते. पण वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करत आपण काहीच गमावले नाही असे सांगितले होते.
मात्र, गुढीवडव्याच्या सभेपासूनच वंसत मोरेंनी मनसे पासून अंतर राखण्यात सुरवात केली होती. नुकतेच राज ठाकरे औरंगाबादच्या सभेला निघण्यापूर्वी मोरे यांचे पुण्यातील निवासस्थान ‘राजमहाल’बाहेर शेकडो पुरोहितांच्या साक्षीने मंत्रपठण करण्यात आले होते. त्यावेळी देखील वंसत मोरे गैरहजर होते. अशात वसंत मोरे हे मनसेला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पण मोरेंनी त्या वेळोवेळी फेटाळल्या देखील आहेत. आता मात्र एकीकडे ‘राज’आज्ञा असताना मोरेंनी शहरातूनच काढता पाय घेतल्याने पुन्हा एकदा मोरे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.