breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून; पंतप्रधानांची घोषणा; आरोग्य कर्मचारी, ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना वर्धक लस

  • पंतप्रधानांची घोषणा; आरोग्य कर्मचारी, ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना वर्धक लस

नवी दिल्ली |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी केली. तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना वर्धक लसमात्रा (बूस्टर डोस) देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले. येत्या जानेवारीपासून देशाच्या लसीकरण कार्यक्रमाचा विस्तार करून त्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात येईल. या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा प्रारंभ ३ जानेवारीपासून होईल, असे मोदी यांनी नमूद केले. तसेच आरोग्य सेवा आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसह ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० जानेवारीपासून वर्धक लसमात्रा देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

देशात करोना आणि त्याच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी रात्री ९.४५ वाजता राष्ट्राला उद्देशून भाषण केले. त्यात त्यांनी ओमायक्रॉनच्या वेगवान संसर्गाबद्दल सतर्कतेच आवाहन नागरिकांना केले. मोदी म्हणाले की जगातील अनेक देशांत ओमायक्रॉनची साथ पसरली असून आपण घाबरून न जाता सतर्क राहण्याची गरज आहे. करोनाची महासाथ अद्याप संपलेली नसल्याने आपल्याला आणखी खबरदारी घेणे आवश्यक आहे. देशाच्या, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही निरंतर काम केले. तज्ञांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाचे टप्पे आणि वयोगट ठरवून मोहीम राबवली. आपल्या लसीकरण मोहीमेला ११ महिने पूर्ण होत असताना आपण लसीकरणाची व्याप्ती वाढवत आहोत, असे मोदी यांनी नमूद केले.

मोदी म्हणाले, १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण सोमवार, ३ जानेवारीपासून सुरू करण्यात येईल. या निर्णयामुळे करोना विरोधातील लढाई आणखी मजबूत होईल. त्याचबरोबर शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंताही कमी होईल. करोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन आजपर्यंत १४१ कोटी लसमात्रा देण्यात आल्या असून ९० टक्क्यांहून अधिक पात्र नागरिकांनी पहिली लसमात्रा घेतली आहे, अशी माहिती मोदी यांनी दिली. नव्या ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घाबरून जाऊ नका, मुखपट्टी वापरा आणि वारंवार हात निर्जंतुक करा, असे आवाहन मोदी यांनी नागरिकांना केले.

देशात १८ लाख विलगीकरण खाटा, पाच लाख प्राणवायूयुक्त खाटा, एक लाख ४० हजार अतिदक्षता खाटा, मुलांसाठी ९० हजार खाटा आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. तसेच देशात ३००० प्राणवायूनिर्मिती केंद्रे असून देशभर चार लाख प्राणवायू र्सिंलडरचे वितरण करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, भारतीय औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लशीचा आपत्कालीन वापर १२ ते १८ वयोगटातील किशोरवयीनांना करण्यास मंजुरी शुक्रवारी दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

  • महाराष्ट्रासह दहा राज्यांत केंद्रीय पथके

महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाबमध्ये केंद्रीय पथके पाठवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

रुग्ण संपर्कशोध, प्रतिबंधात्मक कार्यवाही, करोना चाचण्या आणि रुग्णांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवणे आणि त्यातील काही नमुने ‘इन्साकॉग’ या केंद्रीय यंत्रणेकडे पाठवण्याचे काम ही पथके करतील. करोना नियमांच्या काटेकोर पालनावर लक्ष ठेवणे, रुग्णालयांतील खाटांचा आढावा घेणे, रुग्णवाहिका, श्वसनयंत्रे आणि प्राणवायूची उपलब्धता आणि लसीकरणातील राज्याच्या प्रगतीचा आढावाही पथके घेतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button