breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत नितेश राणेंना कणकवलीत प्रवेशास बंदी”, ‘या’ आहेत कोर्टाच्या ४ मुख्य अटी

मुंबई |

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केलाय. त्यामुळे नितेश राणे यांची तुरुंगातील वारी टळली असली तरी त्यांना कणकवलीत प्रवेश करता येणार नाहीये. याशिवाय आणखी काही अटी घालत न्यायालयाने नितेश राणेंना जामीन दिलाय. याबाबत नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली.

नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई म्हणाले, “न्यायालयाने नितेश राणे आणि राकेश परब या दोघांचाही जामीन अर्ज मंजूर केला आहे. दोघांनाही ३० हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. यावेळी काही अटी घालण्यात आल्या आहेत. यानुसार दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना कणकवली तालुक्यात प्रवेश नाही. आठवड्यातून एकदा म्हणजे सोमवारी १० ते १२ या वेळेत त्यांना ओरस पोलीस स्टेशन येथे हजेरी लावायची आहे. पोलीस जेव्हा तपासात सहकार्य करण्यास बोलावतील तेव्हा त्यांनी हजेरी लावायची आहे. या अटींवर न्यायालयाने जामीन दिला आहे.”

  • “दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना ९० दिवसांपर्यंतचा कालखंड”

“दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना ९० दिवसांपर्यंतचा कालखंड असतो. आत्ताच ४५-५० दिवस झाले असतील. ती १८ डिसेंबरची घटना आहे. त्यामुळे काही दिवसात पोलिसांना दोषारोपपत्र दाखल करावं लागेल. पोलिसांनी त्यांचा तपास जलदगतीने सुरू असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही अपेक्षा करतो की पोलीस लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करतील. नितेश राणे कणकवली तालुका सोडून सिंधुदुर्गमध्ये इतर ठिकाणी येऊ शकतात. ज्या अटी नितेश राणे यांना घालण्यात आल्या आहेत त्याच राकेश परब यांनाही घालण्यात आल्या आहेत,” अशी माहिती संग्राम देसाई यांनी दिली.

  • ‘या’ अटींवर नितेश राणेंना न्यायालयाकडून जामीन मंजूर

१. दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना कणकवली तालुक्यात प्रवेश नाही.
२. आठवड्यातून एकदा म्हणजे सोमवारी १० ते १२ या वेळेत त्यांना ओरस पोलीस स्टेशन येथे हजेरी लावायची आहे.
३. पोलीस जेव्हा तपासात सहकार्य करण्यास बोलावतील तेव्हा त्यांनी हजेरी लावायची आहे.
४. साक्षीदारांवर दबाव आणायचा नाही.

  • “फरार २ आरोपींचा नितेश राणे यांच्याशी काडीमात्रही संबंध नाही”

शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणातील इतर ३ फरार आरोपींवरही नितेश राणेंच्या वकिलाने बाजू मांडली. ते म्हणाले, “या प्रकरणात अनेक आरोपी आहेत. मात्र, ३ आरोपी अद्याप मिळायचे आहेत. त्यात एक गोट्या सावंत आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने हजर व्हायला १० दिवसांचा वेळ दिला आहे. त्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या अधिन राहून निर्णय घेतील.” “बाकी २ आरोपींचा नितेश राणे यांच्याशी काडीमात्रही संबंध नाही. ते नितेश राणे यांच्या संपर्कात होते अशी पोलिसांची केसही नाही. त्यामुळे त्या दोन आरोपींच्या वतीने बोलण्याचा काही प्रश्न येत नाही,” असंही देसाई यांनी नमूद केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button