PCMC : मोकाट कुत्र्यांचा उपद्रव: कस्पटेवस्ती दक्षतानगर सोसायटीतील नागरिक त्रस्त!
तात्काळ कार्यवाहीची गरज : महापालिकेच्या दुर्लक्षामुळे महिलांसह लहान मुलांना त्रास

वाकड, पिंपरी-चिंचवड: कस्पटे वस्ती येथील दक्षतानगर सोसायटीमधील नागरिक सध्या मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे हैराण झाले आहेत. विशेषतः लहान मुलांना चावा घेण्याच्या घटना घडत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, आतापर्यंत चार ते पाच मुलांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अॅपवर वारंवार तक्रारी दाखल करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
या समस्येमुळे महिला, वृद्ध नागरिक व लहान मुले अत्यंत त्रस्त झाले असून, महापालिका प्रशासनाचे याकडे सुरू असलेले दुर्लक्ष चिंताजनक आहे. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना, विशेषतः लहान मुलांना आणि वृद्धांना या कुत्र्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक मुलांना कुत्र्यांनी चावा घेतला असून, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितपणे फिरणे कठीण झाले आहे. महापालिका प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. कुत्र्यांचे निर्बंध, लसीकरण, आणि पुनर्वसन यासारख्या उपाययोजना तात्काळ राबविण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा – आता समुद्राचे खारे पाणी करता येणार गोड; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांची कामगिरी
आमदार जगताप यांनी लक्ष घालावे…
भाजपाचे स्थानिक आमदार शंकर जगताप यांनी या समस्येकडे तात्काळ लक्ष घालून पालिका प्रशासनावर कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी सोसायटीधारकांनी केली आहे. कारण, नागरी समस्यांना तोंड देणारे पिंपरी-चिंचवडमधील अनेक सोसायट्यांना बेवारस कुत्र्यांचा त्रास हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे महानगरपालिकेने याबाबत तातडीने पावले उचलावी, अशी मागणी होत आहे.
‘सारथी ॲप’चा उपयोग काय?
महापालिकेच्या ‘सारथी’ अॅपवर तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे सोसायटीधारकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. विशेषतः दक्षता नगर, कस्पटे वस्ती (वाकड) येथील नागरिकांनी वारंवार मोकाट कुत्र्यांच्या त्रासासंदर्भात तक्रारी नोंदवल्या, मात्र महापालिकेने अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत.सारथी अॅप नागरिकांच्या सेवेसाठी असल्याचा दावा पालिकेकडून केला जातो, परंतु प्रत्यक्षात तक्रारींची दखलच घेतली जात नसल्याने नागरिकांनी अॅपवर विश्वास ठेवणेच बंद केले आहे. या ढिसाळ कारभारामुळे महिला, वृद्ध व लहान मुले यांना मोकाट कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासाचा मोठा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी महापालिका प्रशासनाने तत्काळ याकडे लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा