Breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महापालिकेतर्फे शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन – सभापती तुषार हिंगे

– म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलात 17 खेळांच्या होणार
पिंपरी, ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि खासगी शाळांसाठी विविध 17 खेळांची क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. प्रत्येक शाळेतील 10 ते 17 वयोगटातील मुला-मुलींसाठी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतील उपांत्य व अंतिम सामने बालेवाडीतील शिव छत्रपती क्रीडा संकुलात घेण्यात येणार आहे, अशी माहिती क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्या स्पर्धांच्या नियोजनासाठी क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी नगरसेवक सागर गवळी, माजी नगरसेविका अपर्णा डोके, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे, क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी व क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेत फुटबॉल, खो-खो, कबड्डी, बुद्धीबळ, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, जलतरण, स्केटींग, कुस्ती, हॉकी, थ्रोबॉल, मल्लखांब, क्रिकेट, बास्केटबॉल, हॅण्डबॉल, अॅथलेटिक्स आणि लंगडी या 17 क्रीडा प्रकाराच्या स्पर्धाचे आयोजन केले जाणार आहे.
क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे म्हणाले की, तत्कालिन अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंडे असताना अशा प्रकारे क्रीडा महोत्सव घेतला जात होता. तो कालांतराने बंद पडला. यंदापासून तो पुन्हा सुरू केला जात आहे. खेळासोबत एकांकिका, समुहगीत, नाट्य असे सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहे. खेळाच्या सर्व मैदानाची पाहणी नुकतीच करण्यात आली आहे.
त्या ठिकाणी शुद्ध पाणीपुरवठा करणारी यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा सूचना संबंधित अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच, इतर आवश्यक सुविधाबाबत कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या आहेत. या स्पर्धा जानेवारी महिन्यात आयोजित करण्याचे नियोजन आहे. विजेत्यांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र बक्षीस दिले जाणार आहे. सलग 5 वर्षे विजेतेपद प्राप्त करणार्या शाळेस चांदीचा फिरता चषक बक्षीस दिला जाणार आहे, असे हिंगे यांनी सांगितले.
सर्व शाळांतील विद्यार्थी सहभागी व्हावे
या स्पर्धा आयोजनामागे शाळेतील प्रत्येक विद्यार्थी सहभागी व्हावा. खेळावा अशी संकल्पना आहे. त्यामुळे पालिकेच्या सर्व शाळांमध्ये या 17 खेळांची स्पर्धा घेणे सक्तीचे केले आहे. अन्यथा संबंधित शाळाच्या मुख्याध्यापकांवर कारवाई केली जाणार आहे. या संदर्भातील परिपत्रक सर्व शाळांना पाठविण्याचा सूचना शिक्षण विभागास केल्या आहेत, असे क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे यांनी सांगितले. त्या दृष्टीने शाळेतील क्रीडा शिक्षकांनी आपले संघ तयार करावे, असे आवाहन त्यांनी केले.