‘खेलो इंडिया युथ गेम्स’ स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पुरविणार कामगार

– मे. शुभम उद्योगला 50 कामगारांसाठी सुमारे चार लाख देणार
पिंपरी ( महा ई न्यूज ) – केंद्र व राज्य शासनाच्या ‘खेलाे इंडिया युथ गेम्स-2019’ बालेवाडीतील शिवछत्रपती क्रिडा संकुलात दि. 8 ते 20 जानेवारीपर्यंत या कालावधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून तब्बल 50 कामगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्या कामगाराकडून साफसफाई काम करुन घेण्यासाठी मे. शुभम उद्योग यांना 3 लाख 83 हजार 843 किंवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यतेचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेपुढे ठेवण्यात आला आहे.
म्हांळुगे-बालेवाडीतील शिवछत्रपती क्रिडा संकुलात ‘खेलाे इंडिया युथ गेम्स-2019’ स्पर्धा दि. 8 ते 20 जानेवारीपर्यंत या कालावधीत आयोजित केली आहे. यावेळी 18 खेळांच्या स्पर्धा होणार असून 12 हजार 500 खेळाडू व तांत्रिक अधिकारी व स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. त्या स्पर्धेच्या ठिकाणी स्वच्छता व साफसफाई करणेकामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका 50 स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करुन देण्याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून महापालिका आयुक्तांना कळविले आहे.
त्यानुसार ड क्षेत्रिय कार्यालय परिसर बालेवाडी संकुलाच्या जवळ आहे. त्यामुळे ‘खेलाे इंडिया युथ गेम्स-2019’ च्या स्पर्धेकरिता एकूण 50 कामगार स्वच्छतेसाठी मे. शुभम उद्योग यांचेकडून उपलब्ध करण्यात आले आहेत. स्पर्धेच्या दोन दिवस अगोदर 6 ते 20 जानेवारी 2019 पर्यंत 15 दिवसाकरिता किमान वेतन दराने कामगार उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्या कामास येणारा प्रत्यक्ष खर्च 3 लाख 83 हजार 843 किंवा प्रत्यक्ष होणा-या खर्चास मान्यता मिळणेकामी सदरील विषय स्थायी समिती सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.




