breaking-newsTOP NewsUncategorizedपश्चिम महाराष्ट्रपुणेराजकारणराष्ट्रिय

आढळराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना ‘दे धक्का’, अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे गटात सामील

पुणे (मंचर) : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला आढळराव पाटील यांनी हजेरी लावत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आढळराव पाटील यांच्या राजकीय नाट्यावर आज अखेर पडदा पडला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. परंतु दोन तासांतच नजरचुकीने बातमी छापली सांगत ‘सामना’ने दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना बोलावून घेत त्यांची समजून काढली होती. त्यानंतर आढळरावांनी ‘मातोश्री’वर जाऊन आपण शिवसेनेतच असल्याचे सांगितले होते. मात्र आज शिंदे गटाच्या बैठकीला आढळराव उपस्थित राहिल्याने त्यांनी शिवसेना सोडल्यावर शिक्कामोर्तब झालंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्याकरणी जाहीर केली. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी आढळराव पाटील यांची उपनेतेपदी निवडही केली. त्यामुळे आढळराव पाटील हे शिंदे गटात सामील झाल्याचे आता समोर आले आहे. उद्या सकाळी तातडीने त्यांनी समर्थकांची बैठकही बोलावली आहे.

काही दिवसांपूर्वी सामनामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांची हकालपट्टी झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. त्यानंतर मात्र तातडीने हालचाली करत त्यांची हकालपट्टी मागे घेण्यात आली होती. मात्र, त्या वृत्तामुळे माझी बदनामी झाली. माझी शिवसेनेत काय किंमत आहे, हे मला आता समजलं आहे. आतमधून मी अस्वस्थ आहे. येत्या काही दिवसांतच पुढच्या निर्णयाबाबत विचार केला जाईल, असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. अखेर आज ते शिंदे गटात सामील झाले आहेत.

आढळराव पाटील यांची फेसबुक पोस्ट
शिरूर लोकसभा मतदार संघातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची उद्या मंगळवार दि.१९ जुलै रोजी स. १० वाजता शिवनेरी निवास, लांडेवाडी, तालुका-आंबेगाव येथे माझ्या व शिवसेना जिल्हाप्रमुख जुन्नर विधानसभेचे मा. आमदार शरददादा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तातडीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. कृपया शिवसेना व सर्व अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व तमाम शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, ही विनंती.

सदैव आपला,
शिवाजीराव आढळराव पाटील
शिवसेना उपनेता व मा.खासदार शिरूर लोकसभा

त्या भेटीचा फायदा झाला नाही!
“शिवेसेनेसाठी तुम्ही गेली १५ ते १८ वर्ष काम करत आहात. पक्षासाठी आणि मतदारसंघासाठी आपण प्रामाणिकपणे लढत आहात. आपल्यावरील कारवाई ही नजरचुकीने झाली. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मी लवकरच शिरुर मतदारसंघात दौरा करणार आहे. तुम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरिता तयारीला लागा”, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सांगितले.

शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ येथे गेल्या आठवड्यात भेट घेतली. यावेळी आढळरावांसोबत जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे देखील होते. मागील दोन-तीन दिवसांपूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याचं वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये छापून आलं होतं. आढळराव पाटलांसाठी तो सर्वांत मोठा धक्का होता. आढळरावांच्या थेट भूमिकेने नजरचुकीने कारवाई बातमी छापून आल्याचं ‘सामना’ने स्पष्ट केलं. याच सगळ्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आढळराव पाटलांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button