breaking-newsताज्या घडामोडी

नाशिकमध्ये कौमार्य चाचणीचा प्रकार; जुना व्हिडीओ व्हायरल झाल्याने खुलासा

नाशिक |

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये एका विवाह सोहळ्यात कौमार्य चाचणी केली जाण्याच्या शक्यतेवरुन गोंधळ निर्माण झाल्याचा प्रकार घडलाय. मात्र या प्रकरणामुळे एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला असून हा व्हिडीओ जुना असला तरी अशाप्रकारच्या प्रथा आजही अनेक ठिकाणी अस्तित्वात असल्याबद्दल जात पंचायत मूठमाती अभियानाने नाराजी व्यक्त केलीय.

  • जुना व्हिडीओ व्हायरल…

नाशिकमध्ये रविवारी एक विवाह पार पडला. त्यामध्ये कौमार्य चाचणी घेणार असल्याची तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानाकडे प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर पोलीसांच्या मदतीने ती कौमार्य चाचणी थांबविण्यात आली होती. अशी कौमार्य चाचणी त्यांच्या समाजात होत नसल्याचे जात पंचायतीच्या पंचांनी पोलीसांना लिहून दिले होते. मात्र या दाव्याला छेद देणारा व्हिडिओ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आला आहे. हा व्हिडिओ या विवाहाशी संबधित नसला तरी अशा प्रकारची कुप्रथा चालत असल्याची ग्वाही देणारा आहे.

  • नक्की काय घडलं?

जात पंचायत मूठमाती अभियानाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये रविवारी उच्चशिक्षित तरुण, तरुणीचा विवाह पार पडला. यापैकी तरुणी ही डॉक्टर होती तर तरुण हा मर्चंट नेव्हीमध्ये अमेरिकेत कार्यरत होता. असं असताना या ठिकाणी या जोडप्याने कौमार्याची परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मिळाली. जात पंचायत मूठमाती अभियानाअंतर्गत पोलिसांकडे अर्ज केला. पोलिसांनी त्याची दखल घेत ही प्रथा थांबवलीय, असं चांदगुडे यांनी सांगितलं.

  • पोलिसांनी काय माहिती दिली?

या प्रकरणी पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तक्रार ही त्र्यंबकेश्वर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील होती. “त्रंबकेश्वर पोलीसठाण्यातील अंतर्गत तक्रार प्राप्त झाली होती. एका ठरावीक लग्नामध्ये कौमार्य चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. गोपनीय यंत्रणा सतर्क करुन पोलीसठाण्यातील महिला कर्मचारी आणि महिला अधिकारी यांच्या मार्फत गोपनीय माहीती काढली आहे. सदर लग्नामध्ये सुद्धा पाळत ठेवली आहे. कौमार्य चाचणी असा प्रकार घडला नसल्याचा अहवाल पोलीसठाण्यातुन प्राप्त झाला आहे. सदर संदर्भातील व्हिडिओ आहेत. ते सुद्धा तपासासाठी घेतले आहे,” अशी माहिती पाटील यांनी दिली.

  • व्हायरल व्हिडीओत काय दाखवण्यात आलंय?

या सर्व प्रकरणामध्ये २०१८ सालातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लग्नाच्या रात्री एका हाॅटेलच्या एका खोलीत नववधू व नववर दिसत आहेत. पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर झोपल्यानंतरचा त्यावर पडलेला रक्ताचा लाल डागही दिसत आहे. तसे हे डाग लागलेलं वस्त्र नववधू आपल्या हाताने दाखवत आहे. “हा व्हिडिओ २०१८ चा असला तरी जात पंचायतचे क्रौर्य व अमानुष कुप्रथा समोर आणणारा आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामध्ये सरकारने या कुप्रथेची गंभीर दखल घेऊन ती बंद करण्यासाठी प्रयत्न करायला हवे,” अशी मागणी जात पंचायत मूठमाती अभियानाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी व्यक्त केली आहे.

  • कौमार्य चाचणीविरोधात लढा…

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील अनेक वर्षांपासून कौमार्या चाचणीविरोधात लढत आहे. समितीच्या प्रयत्नाने ही पाचशे वर्षांची कुप्रथा समाजा समोर आणली गेली आहे. परंतु त्याबाबत पुरावा मिळत नव्हता. तो पहिल्यांदाच या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समितीच्या हाती लागलेल्याचं सांगितलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button