breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मराठवाडय़ात डेल्टा प्लस करोना विषाणूचे दोन रुग्ण

जालना |

डेल्टा प्लस हा करोनाचा दुहेरी उत्परिवर्तित विषाणू आढळलेल्या राज्यातील रुग्णांची संख्या आता ४५ झाली आहे. राज्यातील १२ जिल्ह्य़ांमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. मराठवाडय़ातील औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्य़ांत यापैकी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले.

डेल्टा प्लस करोना विषाणू संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांत २७ पुरुष तर १८ महिला रुग्ण आहेत. डेल्टा आणि त्यानंतर दुहेरी परिवर्तन झालेल्या डेल्टा प्लस रुग्णांमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. या दोन्हीही परिवर्तित विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचार पद्धतीमध्ये फारसा फरक नसतो. करोना विषाणूच्या परिवर्तनाचा अभ्यास करण्यासाठी राज्यात जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात येत असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ातून करोना रुग्णांचे १०० नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. राज्यात मागील दीड महिन्यांपासून दररोज करोनाचे सहा ते आठ-साडेआठ हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत. रुग्णसंख्यावाढीचा आलेख स्थिर झाल्यासारखा दिसत आहे. राज्यातील ११ जिल्ह्य़ांत करोना संसर्गाचे प्रमाण राज्याच्या सरासरी रुग्णवाढीच्या तुलनेत अधिक आहे, असे टोपे म्हणाले. राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लसचे सर्वाधिक १३ रुग्ण जळगाव जिल्ह्य़ात तर त्याखालोखाल ११ रुग्ण रत्नागिरी जिल्ह्य़ांत आढळून आलेले आहेत.

जनुकीय क्रमनिर्धारणासाठी राज्यातील प्रत्येकी पाच प्रयोगशाळा आणि रुग्णालयांची निवड सेंटनिल सेंट म्हणून करण्यात आली आहे. या केंद्रांमधून दर पंधरवडय़ास १५ प्रयोगशालेय नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात येतात. जनुकीय क्रमनिर्धारणास गती मिळावी यासाठी राज्य शासनाने इन्स्टिटय़ूट ऑफ जिनोमिक्स अ‍ॅण्ड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेसोबत करार केला आहे. ही प्रयोगशाळा सीएसआरआर अर्थात कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेच्या अंतर्गत काम करते. या माध्यमातून दरमहा राज्यातील सर्व जिल्ह्य़ांतून प्रत्येकी १०० नमुन्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे.

  • भीती बाळगू नका…

करोना विषाणूंचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्बेंसिग) करणे हा करोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग आहे. जनुकीय रचना बदलत राहणे हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग असतो. त्यामुळे जनतेने कोणतीही भीती बाळगू नये आणि करोना अनुरूप वर्तनाचा अवलंब करावा, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. भारतात प्रथमच आढळून आलेल्या बी-६१७.२ या करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूत आणखी परिवर्तन होऊन डेल्टा प्लस विषाणू प्रयोगशाळा तपासणीत आढळल्याचा विषय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या मे महिन्यांत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या सोबत झालेल्या दूरचित्रसंवाद बैठकीत उपस्थित केला होता. जून महिन्यात दुहेरी उत्परिवर्तन झालेल्या करोना विषाणूचे २१ रुग्ण राज्यात आढळले होते. आता ही संख्या ४५ झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button