breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रराजकारण

कोल्हापूरच्या राजकारणात ट्विस्ट : मालोजीराजे पुन्हा विधानसभेच्या मैदानात; काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार?

कोल्हापूर : कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात २००९ साली झालेल्या पराभवानंतर स्थानिक राजकारणापासून थोडे दुरावलेले माजी आमदार मालोजीराजे पुन्हा राजकीय मैदानात उतरले आहेत. फुटबॉलप्रेमी असणारे मालोजीराजे आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय विरोधकांना आव्हान देण्यासाठी सज्ज झाले असून त्यासाठी त्यांनी पोटनिवडणुकीत प्रचाराचं मैदान चांगलंच गाजवलं आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या विजयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह जे अनेक शिल्पकार आहेत, त्यामध्ये मालोजीराजेंचाही अग्रक्रम लागतो. यामुळे ते आता आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीचे भक्कम दावेदार बनले आहेत. (Malojiraje Chhatrapati News)

सन २००४ साली झालेल्या कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मालोजीराजेंनी शिवसेनेचे सुरेश साळोखे यांचा पराभव केला. ते काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झाले. दोनवेळा सेनेचे आमदार झालेल्या साळोखेंची हॅट्रिक त्यांनी चुकवली. तालीम संस्थांना मदत आणि इतर अनेक कामांच्या बळावर त्यांनी पाच वर्ष शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिलं. मात्र २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शिवसेनेचे राजेश क्षीरसागर आमदार झाले. पराभवानंतर त्यांचा संपर्क कमी झाला. त्यामुळे २०१४ साली त्यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारली. २०१९ मध्येही त्यांच्या उमेदवारीची बरीच चर्चा झाली, परंतु तेव्हादेखील त्यांनी मैदानात उतरण्याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे चंद्रकांत जाधव यांच्या गळ्यात काँग्रेसची उमेदवारी पडली आणि ते सहजपणे निवडूनही आले.तब्बल १२ वर्षानंतर आता मात्र मालोजीराजे पुन्हा एकदा कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात सक्रीय झाले आहेत. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शहरात त्यांचा प्रभाव असलेल्या अनेक भागात त्यांनी प्रचाराचा धडाका लावला. यामुळे उत्तरेश्वर, बुधवार पेठ, शिवाजी पेठ यासह काही भागात काँग्रेसला मताधिक्य मिळाले. योग्यवेळी ते काँग्रेसच्या मदतीला धावून आल्याने जयश्री जाधव यांचा विजय सुकर झाला. सतेज पाटील यांचे परफेक्ट नियोजन, त्यांच्या कारभारी मंडळीनी राबवलेली प्रक्रिया, शिवसेनेने केलेली मदत, राष्ट्रवादीने मनापासून दिलेला हात अशा अनेक विजयाच्या कारणात मालोजीराजे आणि मधुरिमाराजे यांनी प्रचारात घेतलेला सहभाग हेदेखील महत्त्त्वाचं कारण मानलं जात आहे.

पोटनिवडणुकीत मालोजीराजेंची एण्ट्री ही आगामी विधानसभेला त्यांची उमेदवारी निश्चित करणारी ठरू शकते. महाविकास आघाडीची मोट असली आणि नसली तरी काँग्रेसच्या चिन्हावर मालोजीराजे मैदानात उतरणार हे निश्चित झालं आहे. आगामी अडीच वर्षात ते या मतदारसंघात पुन्हा एकदा नव्याने संपर्काची पेरणी करणार हे पोटनिवडणुकीतील प्रचाराने पुढे आलं आहे. भाजपने त्यांचे बंधू संभाजीराजे यांना राष्ट्रपती कोट्यातून खासदार केले होते. त्यांची मुदत ३ मे रोजी संपत आहे. यामुळे पक्षीय अडचणही संपल्याने मालोजीराजेंचा मार्गही मोकळा झाला आहे. संभाजीराजे आपला निर्णय पुढील महिन्यात जाहीर करणार आहेत. तत्पूर्वीच मालोजीराजेंनी प्रचाराचे रान उठवत आपली आगामी राजकीय दिशा स्पष्ट केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button