breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या ट्रक्टरला ट्रकची धडक; चार ठार, १९ जखमी

पंढरपूर |

एकादशीनिमित्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी तुळजापूरहून निघालेल्या भाविकांच्या ट्रक्टर ट्रालीला पाठीमागून मालमोटारीची जोरात धडक बसून घडलेल्या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर १९ जण जखमी झाले. यापैकी सहाजणांची प्रकृती गंभीर आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर सोलापूरजवळ कोंडी येथे रात्री पावणेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातातील मृतांची नावे समजली नाहीत. तसेच जखमींमध्ये समावेश असलेल्या एका किशोरवयीन मुलासह चार महिलांचीही नावे समजली नाहीत. राम शिंदे (वय ३०), मच्छिंद्र गोरे (वय ५६), आनंद मिसाळ (वय ६०), समाधान शिवाजी कदम (वय ४०), आकाश किसन गिरी (वय ६५), मंदा कदम (वय ५०), सुलभा साळुंखे (वय ५०), जयश्री साळुंखे (वय ५०), नागनाथ साळुंखे (वय ४०), समर्थ साळुंखे (वय १६), निर्मला कदम (वय ४०), शीतल शिंदे (वय ३५), शुभम अंकुश शिंदे (वय १५), समर्थ अंगद मिसाळ (वय ६) अशी ओळख पटलेल्या अन्य जखमींची नावे आहे. त्यांच्यावर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातातील मृत व जखमी असे सर्वजण वारकरी सांप्रदायातील असून तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील राहणारे आहेत. एकादशीनिमित्त हे सर्वजण पांडुरंगाच्या दर्शनासाठी रात्री ट्रक्टर ट्रालीत बसून पंढरपूरला निघाले होते. सोलापूर-पुणे महामार्गावर शहराला खेटून असलेल्या कोंडी गावच्या शिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या पहिल्या मार्गिकेवर ट्रक्टर ट्रालीला पाठीमागून एका मालमोटारीची (एमएच १२ टीव्ही ७३४८) जोरात धडक बसली. भरधाव वेगातील मालमोटारीच्या पुढील डाव्या बाजूच्या चाकाचे टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि मालमोटार भाविकांच्या ट्रक्टर ट्रालीवर जोरात आदळला. या अपघातात चारजणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींपैकी सहाजणांची प्रकृती गंभीर असून त्यांना शासकीय रूग्णालयात अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शासकीय रूग्णालयाकडे धाव घेतली. घटनास्थळीही जाऊन त्यांनी अपघाताचे निरीक्षक नोंदविले. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक अरूण फुगे हे पुढील तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button