Trapped in the trap of love, then showing the lure of marriage, tortured the young woman, filed a crime
हिंगोली | लग्नाचं आमिष दाखवत प्रियकरानेच तरुणीवर अत्याचार केल्याची घटना हिंगोलीत घडलीये. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. योगेश धनवे असे प्रियकराचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही तरुणी गेल्या ४ मे रोजीपासून बेपत्ता होती. त्यानंतर ती ६ मे रोजी हिंगोलीच्या एका रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन तिची चौकशी केली असता हा सर्व प्रकार पुढे आला.
हिंगोली शहरातील एका वसतीगृहातून तरुणी बेपत्ता झाली होती. शहरातील एका वसतीगृहातील विद्यार्थिनी बीए तृतीय वर्षात शिक्षण घेते. बुधवारी (४ मे) सकाळी महाविद्यालयात जात असल्याचे सांगून ती वसतीगृहातून निघाली. याबाबत तिने वसतीगृहाच्या रजिस्टरमध्ये नोंदही केली होती. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत ती परत आली नाही. त्यामुळे वसतीगृहाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, जमादार एम. एम. टाले यांच्या पथकाने तिचा शोध सुरू केला.
तरुणी रुग्णालयात झाली भरती
शुक्रवारी (६ मे) सायंकाळी ही विद्यार्थिनी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने रुग्णालयात जाऊन मुलीचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला मात्र तिची मानसिक स्थिती बरोबर नसल्यामुळे पोलिसांनी शनिवारी जबाब नोंदवला.
प्रियकराकडून लग्नास नकार
प्रियकराने तिला लग्नाचे आमिष दाखवून विदर्भात नेले. त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर तरुणाने तिच्यासोबत लग्नास नकार दिला. त्यानंतर तिला हिंगोली येथे आणून सोडले. पोट दुखत असल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जमादार टाले पुढील तपास करीत आहेत.