breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाचा अर्जेंटिनावर दणदणीत विजय

टोकियो – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने साखळी फेरीमधील सामन्यात गतविजेत्या अर्जेंटीनावर ३-१ च्या फरकाने दणदणीत मात केली आहे. या विजयासह भारताने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. भारताने ऑस्ट्रेलियाविरोधात पराभव झाल्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे आता भारताकडून विजयाच्या आशा वाढल्या आहेत. आता अ गटाच्या अंतिम सामन्यात भारत ३० जुलै रोजी जपानविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

भारताने आपल्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताने न्यूझीलंड, स्पेन आणि अर्जेंटीनाला धूळ चारली. तर या स्पर्धेमध्ये केवळ ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले आहे. आज अर्जेंटीना विरुद्धच्या सामन्यात दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. पहिल्या हाफपर्यंत दोन्ही संघांचे गोल शून्य होते. त्यानंतर सामन्याच्या ४३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर वरुण कुमारने भारताकडून पहिला गोल करत सामन्यात भारतीय संंघाला १-० ची आघाडी मिळवून दिली. मग चौथ्या क्वार्टरमध्ये अर्जेंटीनाने सामन्यामध्ये आपला पहिला गोल केला. ४८व्या मिनिटाला स्कूथने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामना १-१च्या बरोबरीत आणला. त्यानंतर दोन्ही संघ आक्रमक खेळी करताना दिसले. अटीतटीच्या या सामन्यात भारताकडून ५८व्या मिनिटाला विवेक सागरने गोल करत भारताला २-१ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला म्हणजेच सामन्याच्या ५९व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताची आघाडी ३-१ वर नेली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताला या सामन्यात एकूण ८ कॉर्नर मिळाले. त्यापैकी दोनमध्ये भारताला गोल करण्यात यश आले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button