breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

पंढरपुरातील विठ्ठल दर्शनाची वेळ आता ‘ओमायक्रॉन’च्या संभाव्य भीतीपोटी तासाभराने कमी

पंढरपूर |

‘ओमायक्रॉन’च्या संभाव्य भीतीपोटी येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या दर्शनाची वेळ तासाभराने कमी केली आहे. पूर्वी रात्री १० पर्यंत दर्शनासाठी खुले असणारे मंदिर आता दर्शनासाठी सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले आहे. करोना आणि ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास सक्त मनाई केली आहे. या पाश्र्वभूमीवर मंदिर समितीने दर्शनाच्या वेळेत बदल केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.

येथील श्री विठ्ठल मंदिर ७ सप्टेंबरपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. यात श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे मुख दर्शन, करोनाचे सर्व नियमांचे पालन करून देण्यास सुरूवात झाली. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत दर्शनाची वेळ होती. मात्र, करोनाची वाढती धास्ती, ओमायक्रॉनच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दक्षता बाळगली आहे. त्यानुसार करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.

या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी गजानन गुरव व समिती सदस्य यांनी चर्चा करून दर्शनाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्या नुसार रात्री १० वाजेपर्यंत मंदिर दर्शनाकरिता सुरू न ठेवता रात्री ९ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भाविकांनी सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेतच श्री विठ्ठल रुक्मिणीचे मुख दर्शन घेण्यासाठी यावे, असे आवाहन गुरव यांनी केले.

  • दर्शन रांग ८.३० वाजता बंद होणार…

श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन रात्री नऊ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे. त्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना नऊच्या आत दर्शन मिळणे आवश्यक आहे. यादृष्टीने दर्शनरांगेतील भाविकांना वेळेत दर्शन मिळावे म्हणून रात्री ८.३० वाजता दर्शन रांग बंद करण्यात येणार आहे. भाविकांनी करोनाबाबतच्या नियम व अटींचे पालन करून मंदिर समितीला सहकार्य करावे,असे आवाहन मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button