घरफोडी करून तीन लाखांचे दागिने आणि रोकड लंपास
पिंपरी l प्रतिनिधी
घरमालक घराला कुलूप लाऊन मूळ गावी उत्तर प्रदेश येथे गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत तीन लाख 11 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवार (दि. 14) ते बुधवार (दि. 16) या कालावधीत चंद्रभागा कॉर्नरजवळ रावेत येथे घडली.
शुभी नितीन गोयल (वय 37, रा. रावेत. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोमवारी दुपारी सव्वापाच वाजताच्या सुमारास त्यांच्या घराला कुलूप लाऊन त्यांच्या मूळ गावी उत्तर प्रदेश येथे गेले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचे कडी कोयंडा आणि लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. बेडरूम मधील लॉकर मधून तीन लाख 11 हजार 900 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. फिर्यादी गुरुवारी सकाळी साडेसह वाजता परत आले असता हा प्रकार उघडकीस आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.