breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

तीनशे जवानांची ९ तास झुंज; मिलिंद तेलतुंबडे, दोन कमांडरसह २६ नक्षली ठार झाल्याची पोलिसांची माहिती

गडचिरोली |

शनिवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सी-६० जवानांनी सलग नऊ तास झुंज देऊन २६ नक्षलवाद्यांना ठार के ले. अशी माहिती पोलीस अधिक्षक अंकीत गोयल यांनी रविवारी येथील पत्रपरिषदेत दिली. ठार नक्षलवाद्यांमध्ये केंद्रीय समितीचा सदस्य तथा महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगडची जबाबदारी असलेला मास्टरमाईंड मिलिंद तेलतुंबडे, विभागीय समिती सदस्य लोकेश मडकाम, कसनसूर दलम कमांडर तथा विभागीय समिती सदस्य महेश गोटा यांच्यासह २६ नक्षल्यांचा समावेश आहे.

छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर मर्दिनटोला जंगलात सलग साडेनऊ तास ही चकमक चालली. यात पोलिसांकडून तीनशेवर कमांडो सहभागी झाले होते. तर शंभरपेक्षा अधिक नक्षली गोळीबार करीत होते. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी रविवारी या चकमकीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानुसार मिलिंद तेलतुंबडे याच्यासोबत पथक व इतर नक्षलवादी जंगलात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सी ६० चे पथक व विशेष कृती दलाच्या जवान गस्तीवर असताना शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिले. साडेनऊ तास चकमक चालली. त्यानंतर २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. यापैकी सोळा जणांची ओळख पटली असून दहा मृतक नक्षल्यांची ओळख पटविणे सुरू आहे.

नक्षल्यांकडून ५ एके ४७, एक एकेएम युबिजिअल, नऊ एसएलआर रायफल, तीन ३०३ व इतर साहित्य जप्त करण्यात आले. स्थानिक युवक चळवळीत भाग घेत नसल्याने चाळीस टक्के नक्षलवादी परराज्यातून येत आहेत अशीही माहिती गोयल यांनी दिली.

  • खबऱ्यांना बक्षीस देणार

या संपूर्ण घटनेची माहिती देणाऱ्या खबऱ्याला या नक्षलवाद्यांवर राज्य सरकारच्या वतीने ठेवण्यात आलेले बक्षीस देण्यात येणार असे व खबऱ्यांमुळेच ही मोहीम यशस्वी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

  • सर्व घडामोडींवर पूर्वीपासूनच लक्ष

मागील काही दिवसात नक्षलवाद्यांची भरती येथे मोठय़ा प्रमाणात घेण्यात आली. यातीलच काही नक्षलवाद्यांना प्रशिक्षणासाठी म्हणून बस्तर येथे नेण्यात येणार होते. मिलिंद तेलतुंबडे याच्या नेतृत्वात हे सर्व छत्तीसगडमध्ये जाणार होते. नेमकी हीच माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. तेव्हापासून पोलीस या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते. त्यातच नक्षलवाद्यांना धान्य पुरवठा कशा पद्धतीने, कुठून होतो त्यावरही पोलिसांचे बारीक लक्ष होते.

  • ठार झालेल्यांमध्ये महाराष्ट्र व छत्तीसगडमधील नक्षलींचा समावेश

चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगड व महाराष्ट्रातील एक कोटी ३६ लाखांचे बक्षीस असलेल्या २६ नक्षलवाद्यांचा समावेश आहे. यात महाराष्ट्र छत्तीसगडच्या नक्षलवाद्यांचा नेता केंद्रीय समितीचा प्रमुख मिलिंद तेलतुंबडे याच्यावर ५० लाखाचे बक्षीस होते. छत्तीसगड मधील कंपनी दलम चार कमांडर लोकेश ऊर्फ मंगू पोदायमवर २० लाखाचे, महेश ऊर्फ शिवाजी गोटा याच्यावर १६ लाखांचे बक्षीस होते. ठार झालेल्या छत्तीसगडच्या सात नक्षल्यांवर ४७ लाखांचे बक्षीस होते.

  • बक्षीस पोलिसांना मिळवून देण्याचा प्रयत्न – शिंदे

ठाणे : कोटगुल- ग्यारापत्ती येथे शनिवारी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत नक्षली केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार झाले आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर लाखो रुपयांचे बक्षीस होते. हे बक्षीस चकमकीत सहभागी असलेल्या पोलिसांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button