TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाविकास आघाडीच्या नाटक कंपनीची ही तर नौटंकी : सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके

– पाच वर्षात मुग गिळून बसलेल्या राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पदाधिका-यांना टोला

– सामान्य जनतेची महासभेवर भाजपाची टीका

पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत २०१७ साली महाविकास आघाडीला नाकारून शहरातील नागरिकांनी भाजपाच्या हाती सत्ता दिली. नागरिकांच्या विश्वासाला कुठलाही तडा न जावू देता भाजपाने पाच वर्षाच्या काळात विकासावर भर दिला. यामध्ये महत्वाचे म्हणजे शहराचे वाढते नागरिकरण लक्षात घेता भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप व भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी यांनी शहरासाठी पाण्याचा स्त्रोत, पाण्याची क्षमता वाढविणे, शुध्दीकरण करणे यावर लक्ष केद्रींत केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून आंद्रा- भामा – आसखेड योजनेची मंजूरी मिळविली. २०१८ साली सदर योजनेचा डीपीआर मंजूर केला. १३ सप्टेंबर २०१९ रोजी या कामाची वर्क ऑर्डर देवून महापौर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी यांच्या पाहणी दौ-यानंतर ६ डिसेंबर २०१९ रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. कामाचा वेग पाहता शहराला लवकरच सुरळीत पाणी पुरवठा होणार अशी आशा असताना कोरोना या महामारीच्या दोन वर्षाच्या काळात संथगतीने काम सुरु राहिले. आंद्रा भामा आसखेड धरणातून पिंपरी चिंचवड शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी चिखली येथील १०० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्राचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामे तातडीने पूर्ण करुन दोन महिन्यात नागरिकांना दररोज शुध्द व पुरेसा पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. आज महाविकास आघाडीने फक्त्‍ निवडणुका डोळयासमोर घेतलेल्या नौटंकी सभेद्वारे भाजपाच्या विकास कामांना विरोध करण्याचा तसेच नागरिकांच्या डोळयात धुळ फेकण्याचा प्रकार केला. याला शहरातील सुजाण नागरिकांनी कुठलीही थारा देणार नाही. या नाटक कंपनीने १५ वर्षे सत्तेत असतांना नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. महापालिकेच्या सर्व समित्या तसेच स्मार्ट सिटीत संचालक म्हणून राष्ट्रवादी, शिवसेनेचे सदस्य देखील आहेत. त्या – त्या वेळेस भाजपाच्या विकास धोरणांवर कोणीही विरोध दर्शविला नाही. याचे मिनीटस यांनी बघावे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत देखील नागरिक त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, महाविकास आघाडीच्या नाटक कंपनीच्या नौटंकी सभेला शुभेच्छा, असा टोला देखील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पाच वर्षात मुग गिळून बसलेल्या राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पदाधिका-यांना लगावला आहे.

आज चिखली येथील जलशुध्दीकरण केंद्र प्रकल्पाच्या कामाची पाहणी त्यांनी केली. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके , स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे यांच्यासह सहशहर अभियंता श्रीकांत सवने, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

लोकसंख्या वाढीचा दर आणि शहराच्या विकासाच्या वाढीचा वेग लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आंद्रा व भामा आसखेड धरणातून ९७.६६१ दशलक्ष घन मीटर पाणी कोटाची शासनाकडून मान्यता घेतली आहे. या योजने अंतर्गत जलशुध्दीकरण केंद्रे उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून यामधील एअरेशन फाउंटेन, क्लॅरीफ्लोक्युलेटर, फिल्टर हाऊस, शुध्द पाण्याची संपवेल इत्यादी मुख्य कामे पूर्ण झाली असून दोन महिन्यात पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. शहरातील नागरिकांना पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या महापौरांनी सूचना दिल्या.

शहरातील नागरिकांसाठी पाणी पुरवठा सुलभ होण्याकरीता महापालिकेत सत्तेत आल्यानंतर भाजपाने हा प्रश्न मार्गी लावला. महाविकास आघाडी सरकारने १५ वर्षे सत्ता भोगूनही या विषयाकडे दुर्लक्ष करीत बघ्याची भूमिका घेवून विरोध कायम ठेवला. या महाविकास आघाडीला जनतेच्या प्रश्नांशी काही देणे घेणे नसल्याचे यातून दिसून येते. भाजपाने कुठलीही दिरंगाई न करता हा प्रश्न सर्वप्रथम मार्गी लावून दररोज पाणी पुरवठयासाठी सत्तेत आल्यापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत नियोजन केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने सुरु केलेली नौटंकी ही नागरिकांची मनोरंजन करणारी असून त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आलेला आहे, असेही नामदेव ढाके यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button