breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“५० वर्ष मातृ संघामध्ये छत्रपती शिवरायांचा फोटो लावला नाही त्यांनी…”; ‘त्या’ आरोपामुळे विजय वडेट्टीवार भाजपावर संतापले

मुंबई |

चंद्रपूरमध्ये राजूरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना महाविकास आघाडीमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपावरुन भाजपाला उत्तर दिलंय. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला नाही. भाजपामधील काही नेते खोडसाळपणे या प्रकरणात माझं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवसाला सुरुवात होण्याच्या आधी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटल्यं. तसेच आपल्या मातृ संघामध्ये ज्यांनी ५० वर्षे छत्रपती शिवरायांचा फोटो लावला नाही त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावलाय.

  • प्रकरण काय?

बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रामधील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा असा संघर्ष झाल्याचं पहायला मिळालं. मात्र हा संघर्ष शांत होत असतानाच भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरुन एक नवीन व्हिडीओ शेअर करत महाविकास आघाडीमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप केला.

  • व्हिडीओमध्ये काय आहे?

केशव उपाध्ये यांनी ट्विटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मंत्री विजय वडेट्टीवार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चंद्रपूरमधील राजूरा येथील असल्याचा दावा उपाध्ये यांनी केलाय. मात्र त्याचवेळी त्यांनी वडेट्टीवार हार घालताना पुतळ्याच्या भागावर पाय ठेऊन उभे होते असंही म्हटलंय. याच घटनेवरुन मुख्यमंत्री वडेट्टीवार यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्नही उपाध्ये यांनी उपस्थित केलाय. “महाआघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. चंद्रपुर राजूरा येथे पुतळ्यावर हार घालण्यासाठी पुतळ्याचा भागावरच पाय ठेवला… उद्धव ठाकरे काय ॲक्शन घेणार वडेवट्टीवारांवर की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार?,” अशा कॅप्शनसहीत उपाध्ये यांनी हा व्हिडीओ ट्विट केलाय.

  • वडट्टेवार यांनी काय म्हटलंय…

“हा खोडसाळपणा आहे. केशव उपाध्येंनी डोळं उघडून अंधभक्ताप्रमाणे बघू नये. मी हार घालताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी माझा पाय आहे. पायावर पाय ठेवलेला नाही. जरा अंधभक्त बनू नका. अंधळेपणे बोलू नका. मी उपाध्येंना आव्हान करतोय. माझ्याकडे संपूर्ण व्हिडीओ क्लिप आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय सर्व काही. माझी उंची कमी आहे. त्यामुळे पुतळ्याला हार घालताना (असं झालं),” अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिलीय.

  • “५० वर्ष ज्यांनी छत्रपती शिवरायांचा फोटो लावला नाही…”

“मुद्दाम खोडसाळपणे भारतीय जनता पार्टीचे काही विकृत, काही द्रेष्टे लोकं मुद्दाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील अशा प्रकरणांमध्ये माझं नाव जोडून बदनामी करण्याचं काम करत आहेत. मी स्पष्टपणे सांगतो, हा मुद्दाम केलेला खोडसाळपणा आहे. त्यांच्यामध्ये दम असेल तर यावं तो व्हिडीओ घेऊन आणि सिद्ध करुन दाखवावं. खोडसाळपणा करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा जेवढा आदर आम्हाला आहे. ज्या लोकांनी कधी त्यांच्या मातृ संघामध्ये शिवरायांचा फोटो लावला नाही ५० वर्ष त्यांनी आम्ही शिवरायांच्यासंदर्भात शिकवू नये,” अशी टीका वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. तसेच पुढे बोलताना वडेट्टीवार यांनी, अशाप्रकारची बदनामी करु नये अशी माझी त्यांना विनंती आहे आणि आवाहनही आहे, असंही म्हटलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button