breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शरद पवारांची अ‍ॅलर्जी असण्याचं कारण नाही; छगन भुजबळांचं वक्तव्य

मुंबई |

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर केल्यानंतरही दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह एसटी संघटनांच्या नेत्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीवरुन भाजपाने निशाण साधला आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी घटनाबाह्य, संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात? अशी विचारणा केली आहे. तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांनी महसुलात घट झाल्यानेच शरद पवार चर्चा करण्यास भाग पडले असा दावा केला आहे. भाजपा नेत्यांकडून होणाऱ्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “शरद पवारांची कोणाला अ‍ॅलर्जी असण्याचं कारण नाही. महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जे मोठे नेते आहेत ज्यांच्या मताला आणि अनुभवाला किंमत आहे त्यात शरद पवार आहेत”.

“महाराष्ट्रात दोन महिन्यानंतरही जेव्हा प्रश्न सुटत नाही, तेव्हा लोकांचे प्रश्न सोडवण्याची महाविकास आघाडीची सामूहिक जबाबदारी आहे. त्या महाविकास आघाडीतील एका पक्षाचे ते सर्वोच्च नेते आहे. त्यामुळे त्यांना लोकांची, कामगारांची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. आम्ही गिरणी कामगारांचा संप पाहिला आहे. तो संपला असं अजून कोणी जाहीर केलेलं नाही. त्यामुळे मिलमधील लोक देशोधडीला लागले. एवढा अट्टाहास करणं योग्य नाही,” असंही भुजबळ म्हणाले. “कामगारांना समजावून सांगणं हा शरद पवारांचा हक्क आहे. राज्यकर्ते किंवा मंत्र्यांचं चुकत असेल तर मार्गदर्शन करणं हे त्यांचं काम आहे. त्यात अॅलर्जी असण्याचं कारण नाही,” असं भुजबळांनी सुनावलं.

  • पडळकर काय म्हणाले –

“एसटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने लढा दिला यासाठी मी अभिनंदन करतो. कोणत्याही युनिअनची सभासद फी भरली नाही, महसुलात घट आणली त्यामुळेच शरद पवारांना तुमच्यासोबत चर्चा करण्यास भाग पाडलं,” असं भाजपा आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. “अनिल परब यांना विनंती करायची की आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात, त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाही?,” असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.

“अनिल परब यांनी स्वत: भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल, जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल. तसंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतेच की मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल. माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पावलं पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा, चर्चा करा आणि यावर तोडगा काढा,” अशी मागणी पडळकर यांनी केली.

  • “शरद पवार संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात?”

मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीवरुन भाजपाने नाराजी जाहीर केली आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी टीका करताना मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांकडे चार्ज दिला आहे का? अशी विचारणा केली आहे. “शरद पवार घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात?,” असा सवालही त्यांनी विचारला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button