breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

आधी लगीन कोंढाण्याचं… :  पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत संघटनात्मक बदलाची सुतराम शक्यता नाही!

  • पिंपरी-चिंचवडमधील राजकीय उलथा-पालथीला अखेर पूर्णविराम
  • शहराध्यक्ष बदलाचा निर्णय महापालिका निवडणुकांनंतरच होणार

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील संघटनात्मक बदलांची सध्या सूतराम शक्यता नाही. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी राष्ट्रवादी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे ‘‘आधी लगीन कोंढाण्याचं…’’ या उक्तीप्रमाणे महापालिका निवडणुकीनंतर संघटनात्मक बदलाबाबत काय तो निर्णय होईल, अशी माहिती प्रदेश राष्ट्रवादीतील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

शहर राष्ट्रवादीत मोठ्याप्रमाणात फेरबदल होणार, विद्यमान पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी होणार, अशी चर्चा पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोर धरु लागली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांना राजीनामे देण्याचे आदेश दिले आहेत. आज शुक्रवारी विद्यमान पदाधिकाऱ्यांचे राजीनामे होतील, असे भाकीत वर्तवले जात होते.

याबाबत प्रसारमाध्यमांमधून वृत्तांकनही झाले. त्यामुळे शुक्रवारी राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबड उडणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे कारभारी अजित पवार शुक्रवारी नियमिती वेळापत्रकानुसार पुण्यातील आढावा बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. किंबहूना अजित पवार बारामतीमध्ये व्यस्त होते. त्यामुळे पुण्यातील विधानभवन येथे नवीन शहर नेतृत्त्वाची घोषणा होईल, अशा चर्चेला आता पूर्णविराम मिळाला.

अजित पवार हाच निवडणुकीत राष्ट्रवादीचा चेहरा…

आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला नव्या आणि आक्रमक चेहऱ्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बदल अपेक्षीत आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीतील एका गटाने पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्याकडे मांडली. त्यामुळे बदल होण्याची शक्यता होती. मात्र, निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली आहे. सध्यस्थितीला संघटनात्मक बदल केल्यास बसलेली घडी विस्कळीत होण्याची शकयता नाकारता येणार नाही. तसेच, नवीन शहराध्यक्षांला स्थानिक पातळीवर घडी बसवण्यासाठी पुरेसा वेळही मिळणार नाही. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चेहऱ्यावर आणि केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरी जाणार आहे, असे सांगितले जात आहे.

संजोग वाघेरे-पाटील हेच शहराध्यक्ष हवे…

गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहराध्यक्ष बदलाच्या चर्चेला उधान आले होते. विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील गेल्या सहा वर्षांपासून शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. शांत आणि संयमी असल्यामुळे शहरातील संघटनेवर त्यांची पकड नाही, असा राष्ट्रवादीतील एका गटाचा आक्षेप आहे. मात्र, २०१४ ते २०१९ या काळात पक्षाची राज्यात सत्ता नव्हती. तसेच, २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत अनेक कथित निष्ठावंतांनी पक्षाची साथ सोडली. त्या पडत्या काळात वाघेरे-पाटील यांनी पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले आहे, असा वाघेरे-पाटील समर्थकांचा दावा आहे.  त्यामुळे शहर राष्ट्रवादीतील संभाव्य दुफळीचा धोका लक्षात आल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी संघटनात्मक बदलाचा निर्णय निवडणुकीनंतर घेण्याचा विचार केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button