breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“अभी पिक्चर बाकी है, परळीमधून नवरा विरुद्ध बायको ही लढत होणार”, करूणा मुंडे यांची मोठी घोषणा

परळी |

शिवशक्ती सेना पक्षाच्या संस्थापक करूणा मुंडे यांनी आगामी काळात परळीतून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आमदारकीची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. वेळ आली तर परळीत नवरा विरूद्ध बायको अशी लढत होईल, असं म्हणत करूणा मुंडे यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी गुरुवारी (१३ जानेवारी) पुण्यात रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेमध्ये प्रवेश केला. त्यांना संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली. यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. करुणा मुंडे म्हणाल्या, “माझी घोषणा वेगळी आहे. ‘कार्यकर्ता आगे बढो, करूणा धनंजय मुंडे त्यांच्यासोबत आहे’ अशी माझी घोषणा आहे. मी माझ्या लोकांची नेता झाली आहे, तर मी त्यांचा झेंडा उचलेल. मी आत्ता निवडणूक लढण्याचा विचार केलेला नाही.

मात्र, जर कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याचा आग्रह केला आणि माझ्या आयुष्यात निवडणूक लढावी अशी परिस्थिती आली, तर मी नक्कीच धनंजय मुंडे यांच्याविरोधात परळीतून आमदारकीची निवडणूक लढेन. नवरा विरुद्ध बायको लढत होईल.” “माझ्यावर न्यायालयाने आमच्या वैयक्तिक प्रकरणात काहीही भाष्य करण्यास निर्बंध लावले आहेत. त्यामुळे मी सध्या बोलत नाहीये. मात्र, हे निर्बंध उठवल्यानंतर मी माध्यमांना जाहीर न केलेल्या अनेक गोष्टी सांगणार आहे. अभी तो पिक्चर बाकी है,” असं म्हणत करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.

  • “मला अनेक मंत्र्यांच्या पत्नीचे फोन आले आणि त्यांनी…”

करूणा मुंडे म्हणाल्या, “धनंजय मुंडेंपेक्षा राज्यात करुणा मुंडेंच्याच नावाची चर्चा आहे. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार सुरु आहे. कुठेही न्याय मिळत नाहीये. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारासाठी आंदोलने करावी लागत आहेत. हे राजकारण संपवण्यासाठी मी एक मोहिम सुरु केली आहे. घराणेशाहीचे राजकारण मला संपवायचे आहे. अन्यायाविरुद्ध मी मोहिम सुरु केली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून मी एक एक कार्यकर्त्यांना जोडणार आहे.”

“माझ्या पतीला मी सांगायचे की तुमच्यावर इतिहास रचला जाईल. पण मला हे माहिती नव्हतं की माझ्या पतीवर नाही तर माझ्यावर इतिहास रचला जाणार आहे. मी महाराष्ट्रातील पहिली महिला आहे जिने आपल्या पतीविरोधात आवाज उठवला आहे. मंत्री असणाऱ्या पतीने दोन मुलांची आई असणाऱ्या मला १६ दिवस तुरुंगात पाठवले. महाराष्ट्रात राजकीय पक्ष काढणारी मी पहिली महिला आहे. मी घराणेशाहीच्या घाणेरडे राजकारणाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. जास्तीत जास्त महिलांना होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा. मी जे करत आहे त्यासाठी अनेक मंत्र्यांच्या पत्नीचे मला फोन आले आहेत. त्यांनी आमच्यात हिंमत नाही पण आम्ही तुम्हाला मागून पाठिंबा देऊ शकतो असे सांगितले. मी महिलांना एकच सांगेल की या मोहिमेत अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे,” असे करुणा मुंडे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button