पिंपरी / चिंचवड

महिलेला मारहाण करत घर पाडले

– युवती सेनेच्या पदाधिकारी महिलेच्या सांगण्यावरून हा प्रकार केल्याचा आरोप

पिंपरी l प्रतिनिधी

सात जणांनी मिळून एका महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिला मारहाण केली. महिलेला बळजबरीने घराबाहेर काढून घराच्या भिंती जेसीबीच्या साहाय्याने पाडल्या. महिलेच्या मुलाला देखील विटा फेकून मारत जखमी केले. हा सर्व प्रकार युवती सेना पदाधिकारी महिलेच्या सांगण्यावरून केला असल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी साडेबारा वाजता रामनगर, बोपखेल येथे घडली.

अनिता नंदकिशोर बिलोरीये (वय 50, रा. रामनगर, बोपखेल) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित भिवाल, निलेश भिवाल, विवेक लवेरा, सनी भिवाल, प्रियंका भिवाल, सोनू लवेरा, निकिता पिल्ले, प्रतीक्षा घुले (रा. बोपखेल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिलोरीये शनिवारी त्यांच्या किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या. त्यावेळी आरोपी त्यांच्या घरात आले. ‘तुमची वडिलोपार्जित जमीन डेव्हलपमेंटला दिली आहे. त्याबाबतच्या पॉवर ऑफ ऍटर्नीवर गुपचूप सही कर. नाहीतर तुला जाळून टाकू’ अशी आरोपींनी धमकी दिली. फिर्यादी यांनी सही करण्यास नकार दिला.

आरोपी अमित याने किचनमधील गॅस शेगडी फिर्यादी यांच्या अंगावर फेकून मारली. निलेश आणि विवेक या दोघांनी फिर्यादींना पकडून ठेवले आणि सनी, प्रियंका आणि निकिता यांनी शिवीगाळ करत फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर त्यांना बळजबरीने घराच्या बाहेर काढले. आरोपींनी सोबत आणलेल्या जेसीबी मशीनने फिर्यादी यांच्या घराच्या भिंती व संपूर्ण घर पाडले. त्यावेळी प्रतीक्षा घुले तिथे होत्या. त्यांच्या सांगण्यावरून अन्य आरोपींनी हे भांडण करून घर पाडले.

फिर्यादी यांचा मुलगा अक्षय याने जेसीबी मशीन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी अमित, निलेश, विवेक, सनी यांनी त्याला विटा फेकून मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून हाताने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी प्रतीक्षा घुले या युवती सेनेच्या पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. आम्ही आरोपी सनी भिवाल याला अटक केली आहे. पुढील तपास सुरु असल्याचेही उपनिरीक्षक जोनापल्ले म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button